Pune : पुण्यातील ससून सार्वजनिक रुग्णालयात वैद्यकीय पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे 1 वर्षाच्या बालकाचा जीव वाचल्याची दिलासादायक घटना समोर आली आहे. खेळताना लहान दगडाचा तुकडा गिळल्याने या चिमुकल्याच्या श्वसनमार्गात गंभीर अडथळा निर्माण झाला होता.
काही तासांत परिस्थिती बिकट होत गेली आणि शेवटी तातडीच्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उरला नाही.
घटना अशी की, 2 दिवसांपूर्वी बालकाने खेळताना दगडाचा तुकडा गिळला. सुरुवातीला तो नैसर्गिकरीत्या बाहेर पडेल, असा सल्ला देण्यात आला. मात्र दुसऱ्याच दिवशी बालकाला सतत खोकल्याचे झटके येऊ लागले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पालकांनी विलंब न करता ससून रुग्णालयात धाव घेतली.
तपासणीत एक्स-रेद्वारे समोर आलेले चित्र धक्कादायक होते. दगड श्वासनलिकेच्या मुख्य फाट्याजवळ (कॅरिना) अडकला होता आणि उजव्या बाजूच्या श्वसनमार्गात अंशतः शिरला होता. ही स्थिती काही मिनिटांत जीवघेणी ठरू शकते, कारण अशा वेळी फुफ्फुसांपर्यंत हवा पोहोचण्यावर परिणाम होतो.
कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. राहुल तेलंग यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ पथकाने अतिशय नाजूक शस्त्रक्रिया केली. भूलतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून दगड सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आला. वेळेवर हस्तक्षेप झाल्याने मोठा अनर्थ टळला असून सध्या बालकाची प्रकृती स्थिर आहे.

