Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune News: कोर्टात हजेरी की मौजमजा? आरोपींच्या मोकळीकीला ब्रेक; पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

Pune News: कोर्टात हजेरी की मौजमजा? आरोपींच्या मोकळीकीला ब्रेक; पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

पुणे : शिवाजीनगर न्यायालय परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या काही घटनांनंतर पुणे पोलिसांनी आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयीन कामासाठी आणले जाणारे काही आरोपी या प्रक्रियेचा गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे.

कोर्टात हजेरी लावण्याच्या नावाखाली आरोपींना अनावश्यक मोकळीक मिळत असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली आहे.

काही आरोपी न्यायालय परिसरात फिरत असल्याचे, नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींशी भेटत असल्याचे तसेच मोबाईलचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. काहींनी तर सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करण्यापर्यंत धाडस केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली आहे. न्यायालयात आरोपींना आणण्याची प्रक्रिया ही केवळ कायदेशीर बाब असावी, त्याचा वापर कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारासाठी होऊ नये, यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

नुकत्याच घडलेल्या एका घटनेत न्यायालयाच्या स्वच्छतागृहात एका आरोपीपर्यंत गांजा पोहोचवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपीला बाहेरून अमली पदार्थ मिळाल्याने पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. या घटनेनंतर संपूर्ण न्यायालय परिसराची सुरक्षा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे पोलिसांनी आता आरोपींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन व्यवस्था तयार केली आहे. आरोपींना कारागृहातून थेट न्यायालयात आणले जाईल आणि सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना तातडीने परत कारागृहात नेले जाईल. या काळात अधिकृत पोलिस कर्मचाऱ्यांशिवाय इतर कोणालाही आरोपींशी संपर्क साधता येणार नाही. तसेच प्रवेशद्वारांवर तपासणी अधिक कडक केली जाणार आहे. न्यायालय परिसरात तंबाखू, गुटखा, अमली पदार्थ किंवा इतर संशयास्पद वस्तू आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

यासोबतच शक्य असलेल्या प्रकरणांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे आरोपींची न्यायालयात होणारी वारंवार ये-जा कमी होईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News