न्हावरे: पुणे-अहिल्यानगर महामार्गासाठी चार पदरी,सहा पदरी,उन्नत मार्ग आणि मेट्रोचे नियोजन कागदावर वेगाने धावत असताना,न्हावरे ते चौफुला राष्ट्रीय महामार्गाची अवस्था मात्र प्रवाशांच्या संयमाची परीक्षा पाहणारी ठरत आहे.रस्त्यावर पुरेसे दिशादर्शक फलक नाहीत, कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याच्या तक्रारी आहेत आणि आवश्यक त्या अपुऱ्या सुविधा असल्याने हा महामार्ग सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
एका बाजूला प्रशासनाच्या पत्रात भविष्यातील महामार्गाचा 'भव्य' आराखडा दिसतो; तर दुसऱ्या बाजूला न्हावरे ते चौफुला मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रस्ता शोधण्यापासून ते गाडीतील धक्के सहन करण्यापर्यंतचा रोजचा संघर्ष करावा लागत आहे.
विशेष म्हणजे,या मार्गावर अनेक ठिकाणी आवश्यक दिशादर्शक अथवा माहिती फलकांचा अभाव जाणवतो.त्यामुळे अपरिचित वाहनचालकांसाठी 'गुगल मॅप'पेक्षा देवाचा धावा आणि स्थानिकांना विचारणे हा पर्याय अधिक उपयोगी ठरत असल्याची उपरोधिक चर्चा आहे.
रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.रस्त्याची स्थिती,अपुऱ्या व्यवस्था आणि प्रवाशांना होणारा त्रास पाहता राष्ट्रीय महामार्गाचा प्रवास म्हणजे प्रवास कमी आणि साहसी खेळ अधिक,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आणि या सगळ्यात सर्वाधिक मजेशीर अनुभव मिळतो तो प्रवाशांना गाडीत बसल्यानंतरच!
रस्त्यावरील खड्डे,उंच-सखल भाग आणि धक्क्यांमुळे वाहनातील प्रवाशांना अक्षरशः 'तिकीट न काढता डान्स' करण्याचा अनुभव मिळत आहे.गाडीच्या चालकाने ब्रेक मारला की पुढचा प्रवासी पुढे, खड्डा आला की मागचा प्रवासी वर आणि रस्ता खराब मिळाला की संपूर्ण गाडीच ताल धरते-असा 'नैसर्गिक डान्स फ्लोअर' या मार्गावर तयार झाला आहे!
फरक एवढाच-डान्स बारमध्ये लोक स्वतःच्या इच्छेने नाचतात; न्हावरे-चौफुला महामार्गावर प्रवाशांना रस्ता नाचवतो!
एकीकडे पुणे-शिरूर प्रकल्पासाठी मोठमोठे आराखडे,उन्नत मार्ग आणि मेट्रोचे नियोजन सांगितले जात आहे.दुसरीकडे विद्यमान मार्गावरील मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. त्यामुळे नागरिकांचा सवालही तितकाच मार्मिक आहे-'भविष्यात मेट्रो धावणार असेल तर सध्याच्या रस्त्यावर प्रवाशांचा डान्स कधी थांबणार?'
महामार्ग हा केवळ सिमेंटचा पट्टा नसून तो हजारो नागरिकांच्या रोजच्या सुरक्षित प्रवासाचा आधार आहे.त्यामुळे संबंधित यंत्रणांनी रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासणे,आवश्यक फलक लावणे, अपुऱ्या सुविधा पूर्ण करणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
अन्यथा कागदावर महामार्ग कितीही पदरी झाला,तरी प्रत्यक्ष रस्त्यावर प्रवाशांचा 'डान्स' सुरूच राहणार!
प्रशासनाने आता पत्रातील महामार्ग प्रत्यक्षात आणण्यापूर्वी न्हावरे-चौफुला मार्गावरील प्रवाशांना किमान 'डान्स फ्लोअर'पासून तरी मुक्त करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

