Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे-शिरूर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आमदार माऊली आबा कटके आणि PMRDA आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचा संयुक्त पाहणी दौरा

पुणे-शिरूर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आमदार माऊली आबा कटके आणि PMRDA आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचा संयुक्त पाहणी दौरा

पुणे: पुणे-शिरूर आणि हडपसर-यवत उन्नत मार्गांच्या कामांमुळे भविष्यात वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शिरूर-हवेली मतदारसंघात पर्यायी रस्त्यांची पाहणी करण्यात येणार आहे. यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके आणि पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचा संयुक्त दौरा शनिवार, 1 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.

उन्नत मार्गांच्या कामादरम्यान मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पर्यायी मार्ग विकसित करणे, विद्यमान रस्त्यांचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करणे तसेच आवश्यक ठिकाणी नवीन जोडरस्ते तयार करण्याच्या दृष्टीने या दौऱ्यात प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. वाढत्या वाहतुकीचा विचार करून दीर्घकालीन नियोजन करण्यावरही भर दिला जाणार आहे.

आमदार माऊली आबा कटके यांनी या प्रश्नाबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हा संयुक्त दौरा निश्चित करण्यात आला आहे. मतदारसंघातील नागरिकांना भविष्यात वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये आणि विकासकामांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी वेळेत सोडवता याव्यात, हा या पाहणीचा मुख्य उद्देश आहे.

दौऱ्याची सुरुवात सकाळी 11 वाजता टाउनशिप-मांजरी, आव्हाळवाडी येथून होणार आहे. त्यानंतर शिवरस्ता, केसनंद, आव्हाळवाडी, मांजरी, कोलवडी, थेऊर, प्रयागधाम, कोरेगाव, टाकळी भीमा, सणसवाडी, कोरेगाव-पिंपळे जगताप आणि तुळापूर-भावडी या परिसरातील रस्त्यांची पाहणी केली जाणार आहे. तुळापूर-भावडी येथे या दौऱ्याची सांगता होईल.

या पाहणीदरम्यान संबंधित रस्त्यांची सद्यस्थिती, वाहतुकीचा सध्याचा ताण, भविष्यातील वाहनसंख्येचा अंदाज तसेच नवीन रस्ते आणि जोडमार्ग उभारणीच्या शक्यता यावर पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा होणार आहे. या दौऱ्यातून वाहतूक व्यवस्थेचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News