Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

पुणे: पुण्यातील विमाननगर परिसरात एका 80 वर्षीय वृद्ध महिलेची देखभाल करणाऱ्या महिला केअरटेकरने विश्वासघात करत लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून त्यांच्या जागी हुबेहूब बनावट बांगड्या घालण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अनिता रामचंद्र सुतार (वय 45, रा. मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर) हिला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय राजकुमार कनोत्रा हे विमाननगर येथील कोनार्क कॅम्पसमध्ये आपल्या 80 वर्षीय आईसोबत राहतात. आईच्या देखभालीसाठी त्यांनी चार महिला केअरटेकर नियुक्त केल्या होत्या. त्यापैकी अनिता सुतार ही घरात राहून वृद्ध महिलेची काळजी घेत होती.

21 मे रोजी अनितानेच अजय कनोत्रा यांना वृद्ध महिलेच्या हातातील चार बांगड्यांपैकी एक बांगडी दिसत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर अजय यांनी शोध घेतला, मात्र बांगडी सापडली नाही. संशय येऊ नये म्हणून त्यांनी उरलेल्या तीन बांगड्यांचे फोटो मोबाईलमध्ये जतन करून ठेवले.

काही दिवसांनी अजय कामानिमित्त बाहेर जाऊन परतल्यानंतर त्यांनी आईच्या हातातील बांगड्या पाहिल्या. त्या पूर्वीपेक्षा वेगळ्या दिसत असल्याने त्यांनी मोबाईलमधील फोटोशी तुलना केली. त्यावेळी खऱ्या सोन्याच्या बांगड्यांच्या जागी बनावट बांगड्या घालण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने विमानतळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

तपासादरम्यान पोलिसांनी चारही महिला केअरटेकरची चौकशी केली. यामध्ये अनिता सुतारच्या जबाबात विसंगती आढळल्याने तिची अधिक चौकशी करण्यात आली. चौकशीत तिने चोरीची कबुली दिली. तिने आधी एक बांगडी चोरल्यानंतर त्याच प्रकारच्या बनावट बांगड्या तयार करून वृद्ध महिलेच्या हातात घातल्याचे समोर आले.

पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या सोन्याच्या बांगड्या, घरातील चांदीचे ग्लास, निरंजन असा सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News