Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यात रातोरात 40 टन ऊस गायब; साखर महागली अन् चोरांनी शोधली चोरीची नवी शक्कल!

पुण्यात रातोरात 40 टन ऊस गायब; साखर महागली अन् चोरांनी शोधली चोरीची नवी शक्कल!

पुणे : सणासुदीच्या दिवसांत साखरेचे भाव वाढल्याची चर्चा सुरू असतानाच, पुण्यातून एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. एरवी मौल्यवान वस्तू किंवा वाहनांची चोरी झाल्याचे समोर येते मात्र आता हवेली तालुक्यातील आष्टापूर येथे चोरट्यांनी थेट शेतातील उभा ऊस कापून नेल्याचा अजब प्रकार घडला आहे.

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आष्टापूर येथील शेतकरी अनिल नंदकुमार कामठे यांची गट क्रमांक 822 मध्ये शेती आहे. कामठे कुटुंब 19 ते 23 ऑगस्टदरम्यान कामानिमित्त मुंढव्याला गेले होते. शेतात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या शेतावर डल्ला मारला. कामठे कुटुंबीय परत आल्यावर त्यांना शेतातील सात महिन्यांचा वाढलेला ऊस गायब झाल्याचे दिसले. पाहणी केली असता, सुमारे 88,000 रुपये किमतीचा तब्बल 40 टन ऊस चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी त्यांनी 24 ऑगस्ट रोजी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. मिळालेल्या सुगाव्याच्या आधारे पोलिसांनी नवनाथ लक्ष्मण कोतवाल (वय 29) याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता, योगेश पोपट गव्हाणे (वय 25, दोघे रा. आष्टापूर) याने आपल्या कामगारांच्या मदतीने हा ऊस तोडून लंपास केल्याचे उघड झाले. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊस वाहून नेण्यासाठी कोणत्या वाहनांचा वापर करण्यात आला, तसेच या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, साखरेचे दर वाढल्यामुळे चोरट्यांनी थेट शेतातून ऊसच पळवल्याची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News