Dailyhunt
पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा कारनामा! '"मी शिंदेंचा माणूस आहे!", म्हणत पोलिसांना धमकावलं; खाकीलाच चकवा देण्याचा प्रयत्न

पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा कारनामा! '"मी शिंदेंचा माणूस आहे!", म्हणत पोलिसांना धमकावलं; खाकीलाच चकवा देण्याचा प्रयत्न

पुणे: पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'ओएसडी' असल्याचा बनाव (Pune Crime) करून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया व्यक्तीचा पर्दाफाश झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

सरकारी पद आणि ओळखीचा धाक दाखवत तपासात हस्तक्षेप करण्याचा हा प्रकार उघड झाल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. (Latest Marathi News)

या प्रकरणातील आरोपी प्रद्युम्न श्रीहरी पाटील (वय 47, रा. हिंजवडी) याने थेट परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त रिषीकेश रावले यांच्या कार्यालयात प्रवेश करून अधिकाऱ्यांनाच जाब विचारण्याचा प्रयत्न केला. "तपास नीट होत नाही" असा आरोप करत त्याने स्वतःला उपमुख्यमंत्र्यांचा जवळचा अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच आपल्या कथित ओळखीचा दबाव टाकत तपासात हस्तक्षेप करण्याचाही प्रयत्न केला.

मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. उपायुक्त रावले यांनी तातडीने त्याच्या ओळखीची पडताळणी केली. अधिकृत चौकशीत पाटील याचा उपमुख्यमंत्र्यांशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याचा खोटेपणा उघड झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 204 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीची सखोल चौकशी सुरू असून, त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे कोणाला फसवले आहे का, याचा तपास केला जात आहे.

या घटनेमुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून दबाव टाकण्याचे प्रकार किती धोकादायक ठरू शकतात, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. तसेच अशा बनावट ओळखींचा वापर करून प्रशासनात हस्तक्षेप करण्याच्या घटनांवर अधिक कडक कारवाईची गरज असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News