Dailyhunt
राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

Crime News: छत्रपती संभाजीनगर : शहरात अवैध गर्भपाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या प्रकरणानंतर आता आणखी एक मोठे रॅकेट पोलिसांनी उघड केले आहे.

या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोग्य व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन सख्ख्या बहिणी एका नर्सच्या मदतीने मागील सुमारे 1.5 वर्षांपासून घरगुती पद्धतीने बेकायदेशीर गर्भपात करत होत्या. या कामासाठी त्यांनी महिलांकडून 70 ते 80 हजार रुपये इतके पैसे घेतल्याची माहिती समोर आली आहे. या रॅकेटचे धागेदोरे काही डॉक्टरांपर्यंत पोहोचत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रविवारी पोलिस आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाने संयुक्त कारवाई करत वर्षा बाबासाहेब जाधव आणि उज्ज्वला विठ्ठल गायकवाड या दोघींना रंगेहात पकडले. या महिलांकडे रुग्ण पाठवणारा सिल्लोड येथील डॉ. विकास मिठाराम आहेर यालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी एक साथीदार ज्योती पवार फरार असून तिचा शोध सुरू आहे.

पोलिस तपासात समोर आले की, अटक केलेला डॉक्टर शिक्षणाने MBBS असून त्याने अल्प कालावधीत मोठी मालमत्ता उभी केली आहे. या संपत्तीचा संबंध बेकायदेशीर गर्भपातातून मिळालेल्या पैशांशी असू शकतो, असा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांविरोधात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News