पुणे : आज १ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठेच्या 'लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा गौरव प्रदान करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व्यासपीठावर उपस्थित होत्या.
समारंभात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाचे जोरदार समर्थन केले. २०१४ पासून देशात सुरू असलेल्या कल्याणकारी पर्वाचा उल्लेख करत त्यांनी मोदी आणि शाह यांच्या जोडीची तुलना प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांच्याशी केली. देशभरातील नागरिक या नेतृत्वाला श्रद्धेने ‘मोदी-शाही’ म्हणून ओळखतात, असा दावा त्यांनी केला.त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या राष्ट्रसेवेचे आणि सीमेवरील संरक्षणातील योगदानाचे मनापासून कौतुक केले. अंतर्गत सुरक्षा बळकट करणारे अमित शाह आणि सीमा सुरक्षित ठेवणारे अजित डोवाल यांचा हा एकत्र सन्मान म्हणजे देशाच्या राष्ट्रशक्तीला वंदन करण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.
पुण्यातील या व्यासपीठावरून एकनाथ शिंदे यांनी केलेले हे भाषण आणि दिलेली राम-लक्ष्मणाची उपमा सध्या राजकीय वर्तुळात तसेच समाजमाध्यमांवर चांगलीच चर्चेत आली आहे

