(प्रतिनिधी) पोपट पाचंगे
Ranjangao ganapati - जुने शिरुर, ता.शिरुर येथील अनेक वर्षांची परंपरा असलेल्या श्री भैरवनाथांची बगाड यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात पार पडली.
‘नाथ साहेबांचं चांगभलं’च्या जयघोषात आणि भंडाराच्या उधळणीत बगाड यात्रा सोहळा संपन्न झाला.
बुधवारी, दि.१ रोजी सकाळी श्री देव्हडेश्वर मंदिरापासून कावड आल्यानंतर भैरवनाथ मंदिरासमोर गाडे – बगाड आकर्षक फुलांनी सजविण्यात आले.
जुने शिरुर येथील शिरुर पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री भैरवनाथ मंदिरापासून दुपारी बारा वाजता देवाची धुणी उधळताच बगाड हलले. अभंग परिवाराने ‘नाथसाहेबांचे चांगभले’ च्या जयघोषात बगाड पुढे नेले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती स्वाती घावटे,सरपंच शिल्पा गायकवाड,माजी आदर्श सरपंच अरुण घावटे, नामदेव जाधव,नितीन बोऱ्हाडे,नामदेव घावटे,नगरसेवक निलेश गाडेकर, उपसरपंच सचिन घावटे,श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे रावसाहेब घावटे, खजिनदार पोपटराव दसगुडे, आदीसह ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते. देवस्थानच्या वतीने किरण घावटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
रणरणत्या उन्हात व ढगाळ वातावरणात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाषाणवाडी येथे बगाड आल्यानंतर वृद्धासह तरुणांनी छबिना नाचविला.त्यानंतर तर्डोबाचीवाडीच्या शिवेवर वऱ्हाडी मंडळीचा पानसुपारी देऊन सन्मान करण्यात आला. सायंकाळी उशिरा बगाड तर्डोबाचीवाडी येथे विसावल्या नंतर पालखीतून देवाला मंदिरात नेले.
तिथे वाद्याच्या गजरात, मंगलाष्टकांच्या सुरात श्री भैरवनाथ – जोगेश्वरीचा विवाह मोठया थाटामाटात संपन्न झाला. यावेळी शिरुर शहर व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

