Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शनिवारवाड्याचा 'हजारी कारंजा' पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

शनिवारवाड्याचा 'हजारी कारंजा' पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

पुणे: पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यातील तब्बल 250 वर्षांपूर्वीची जलव्यवस्था पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत शनिवारवाड्यातील प्राचीन पाणीपुरवठा यंत्रणा, जलमार्ग आणि प्रसिद्ध 'हजारी कारंजा'चे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.

यासाठी केंद्र सरकारकडून कार्यादेश मिळाला असून, पावसाळ्याचा अंदाज लक्षात घेऊन लवकरच उत्खननाचे काम सुरू होणार आहे.

इतिहासानुसार, सुरुवातीच्या काळात शनिवारवाड्यात कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची सुविधा नव्हती. त्यानंतर नानासाहेब पेशवे यांनी कात्रज परिसरात धरणे आणि कृत्रिम तलाव उभारून नियोजनबद्ध नळयोजना विकसित केली. या योजनेद्वारे कात्रजमधील पाणी वर्षभर शनिवारवाड्यापर्यंत आणले जात असे. या पाण्याच्या आधारे संपूर्ण वाड्यातील जलव्यवस्था कार्यरत होती आणि विविध कारंजेही सुरू राहत होती.

शनिवारवाड्यातील ‘हजारी कारंजा’ हे त्या काळातील स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. सवाई माधवराव यांच्या मनोरंजनासाठी नाना फडणवीस यांनी हे कारंजे बांधल्याची नोंद आहे. कमळाच्या आकारातील या कारंज्यात 16 पाकळ्या असून प्रत्येक पाकळीत 16 पाण्याचे फवारे होते. अशा एकूण 256 तोट्यांमधून पाण्याचे फवारे उडत असत. कात्रजमधून आणलेल्या पाण्यावर ही संपूर्ण यंत्रणा चालत होती. आता या ऐतिहासिक कारंज्याचे पुनरुज्जीवन करण्याची तयारी सुरू झाली आहे.

यासोबतच शनिवारवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दिल्ली दरवाजाच्या संवर्धनाचे कामही हाती घेण्यात येणार आहे. ऊन, वारा आणि पावसामुळे दरवाजाच्या दगडी रचनेचे नुकसान झाल्याने त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय पुरातत्त्व विभागाने दिली आहे.

या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञ पथकाकडे असून, शनिवारवाड्याचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे मानले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News