Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शेतकरी बापाचं लेकीला IAS बनवण्याचं स्वप्न! शहरात पाठवलं, होस्टेलवर ठेवलं अन् फोन बंद करून तरुणी अचानक गायब.

शेतकरी बापाचं लेकीला IAS बनवण्याचं स्वप्न! शहरात पाठवलं, होस्टेलवर ठेवलं अन् फोन बंद करून तरुणी अचानक गायब.

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील शेतकरी कुटुंबाने आपल्या मुलीला आयएएस अधिकारी बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी 20 वर्षीय मुलीला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले.

नूतन कॉलनीतील एका हॉस्टेलमध्ये राहून ती अभ्यास करत होती. मात्र, 25 मे 2024 रोजी सायंकाळच्या सुमारास हॉस्टेलमधून बाहेर पडल्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली. तब्बल 15 महिने उलटूनही तिचा ठावठिकाणा लागलेला नाही.

मुलीने 27 मे रोजी आई-वडिलांशी शेवटचा फोनवरून संपर्क साधला होता. त्यानंतर तिचा मोबाईल कायमचा बंद झाला. मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद क्रांती चौक पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर पोलिसांसह कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, अनेक प्रयत्न करूनही तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

दरम्यान, मुलीचा शोध सुरू असताना तिच्या मैत्रिणीने एक महत्त्वाची माहिती दिली. रोहित राजपूत नावाचा तरुण आमिष दाखवून तिला सोबत घेऊन गेल्याचे मैत्रिणीकडून सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला. मात्र, तो सातत्याने आपले ठिकाण बदलत असल्याने पोलिसांच्या हाती लागला नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

मुलगी नेमकी कुठे आहे, ती सुरक्षित आहे का, याबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढत गेली. अखेर मुलीच्या वडिलांनी 25 सप्टेंबर रोजी औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान संशयित रोहित राजपूत आणि त्याचे काही नातेवाईक उपस्थित राहिले नाहीत. न्यायालयाच्या समन्सनंतरही संशयित फरार राहिल्याने कुटुंबीयांचा त्याच्यावरील संशय आणखी बळावला.

मुलीला फूस लावून घेऊन गेल्याचा संशय व्यक्त करत अखेर पालकांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी रोहित राजपूत याच्याविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली असून, त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्या 15 महिन्यांपासून लेकीच्या शोधात असलेल्या आई-वडिलांना आता ती कुठे आहे आणि तिच्यासोबत नेमके काय घडले, याची प्रतीक्षा आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News