अक्षय टेमगिरे
शिक्रापूर : शिक्रापूर येथील राज हॉटेल शेजारी असलेल्या शिवराज मोबाईल रिपेअरिंग दुकानाचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्याने रिपेअरिंगसाठी आलेले मोबाईल फोन व पॉवर बँक असा एकूण १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष विश्वनाथ सानप वय ३५ वर्ष रा. शिक्रापूर ता. शिरूर, जि. पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष सानप यांचे शिक्रापूर येथील पुणे-नगर महामार्गालगत राज हॉटेलजवळ शिवराज मोबाईल रिपेअरिंग नावाचे दुकान आहे. २३ जुलै रोजी रात्री दुकान बंद करून ते घरी असता दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडल्यानंतर रिपेअरिंगसाठी आलेले चार मोबाईल फोन आणि चार पॉवर बँक जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तपासणी केली असता दुकानाचा समोरील पत्रा उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
चोरीस गेलेल्या ऐवजात वन प्लस नॉर्ड सी-२ विवो टी-३, टेक्नो आणि सॅमसंग गॅलेक्सी कंपनीचे मोबाईल तसेच चार मोबाईल चार्जिंग पॉवर बँकांचा समावेश असून, एकूण १७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कर्पे हे करीत आहेत.

