Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिक्षण क्षेत्राचा आधारस्तंभ हरपला! डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे व्यक्तिमत्त्व हरपले

शिक्षण क्षेत्राचा आधारस्तंभ हरपला! डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे व्यक्तिमत्त्व हरपले

कोल्हापुर: देशातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनामुळे शिक्षण, सामाजिक, राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आंबप या गावात त्यांचा जन्म झाला. साध्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देशातील शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा विकास साधण्याचा त्यांचा ध्यास आयुष्यभर कायम राहिला.

राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी काँग्रेस पक्षातून केली. 1957 ते 1962 या कालावधीत ते कोल्हापूरचे महापौर होते. त्यानंतर 1967 आणि 1972 मध्ये पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. पुढे त्यांची त्रिपुरा आणि बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. काही काळ त्यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला.

राजकारणानंतर त्यांनी पूर्ण लक्ष शिक्षण क्षेत्रावर केंद्रित केले. 1983 मध्ये नवी मुंबई येथे रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (RAIT) या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करून त्यांनी शैक्षणिक प्रवासाला सुरुवात केली. पुढे डी. वाय. पाटील ग्रुपचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला.

आज या समूहाअंतर्गत 3 पेक्षा अधिक डीम्ड विद्यापीठे, 6 खासगी विद्यापीठे आणि 180 हून अधिक शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी, दंतवैद्यकीय, फार्मसी, व्यवस्थापन, कृषी, नर्सिंग आणि इतर अनेक शाखांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.

शिक्षणासोबतच त्यांनी आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातही मोठे काम केले. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक मानले जाते. येथे अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, आयपीएल स्पर्धा आणि इतर मोठे क्रीडा कार्यक्रम पार पडले आहेत. तसेच विविध रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांद्वारे आरोग्य सेवेलाही त्यांनी चालना दिली.

1991 मध्ये शिक्षण आणि समाजसेवेतील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले होते. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पश्चात पुत्र डॉ. संजय पाटील, सतेज (बंटी) पाटील, विजय पाटील, डॉ. अजिंक्य पाटील, कन्या डॉ. नंदिता पालशेतकर तसेच इतर कुटुंबीय असा परिवार आहे. त्यांचे नातू ऋतुराज पाटील हेही सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत.

दरम्यान, अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी उभारलेला भक्कम पाया आणि समाजासाठी केलेले कार्य कायम स्मरणात राहील, अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News