शिरूर: शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वीज वितरण रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांना अखेर शिरूर पोलिसांनी आळा घातला आहे. गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्या चौकशीत तब्बल १८ डीपी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपींकडून ३०० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा,एक मोटारसायकल असा सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सुरुवात आण्णापूर (ता. शिरूर) येथील दत्तात्रय कापसे व शेख मुलानी यांच्या शेतातील वीज वितरण रोहित्र (डीपी) फोडून त्यामधील सुमारे १५० किलो तांब्याच्या तारा चोरी झाल्यापासून झाली. याप्रकरणी गणेश राजेंद्र दिवे (रा. प्रीतमप्रकाश नगर, शिरूर) यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, शिरूर परिसरात सातत्याने होत असलेल्या डीपी चोरीमुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. त्यामुळे ग्रामस्थ,शेतकरी तसेच उद्योग-व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व तपास पथकाने गुप्त माहिती संकलन आणि तांत्रिक विश्लेषण सुरू केले. यावेळी पोलीस अंमलदार विजय शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शिरूर येथील हुडको कॉलनी परिसरात सापळा रचून संतोष बारकू भालेराव व किरण गोविंद खंडागळे (दोघे रा. जळके बुद्रुक, ता.खेड, जि. पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली देण्याबरोबरच त्यांच्या साथीदारांसह शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळी हाजी बेट परिसरात आणखी १८ ठिकाणी डीपी चोरी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीतील ३०० किलो तांब्याच्या तारा आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १० जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या गुन्ह्यात आणखी आरोपी किंवा इतर चोरीच्या घटनांचा संबंध आहे का?याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ.शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार शरद वारे, पोलीस अंमलदार विजय शिंदे, अक्षय कळमकर, निखिल रावडे, नितेश थोरात, निरज पिसाळ, अंबादास थोरे, सचिन भोई, वैभव शेलार, रविंद्र काळे, दादाराव नागरे व अजय पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
डीपी चोरीमुळे वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता. शिरूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अशा चोरट्यांवर मोठा प्रतिबंध बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

