Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोरतापवाडीत 30 लाखांच्या हायवा ट्रकसह चोरीची वाळू जप्त; ट्रक चालकाला अटक तर ट्रक मालक लोणी काळभोरचा, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

सोरतापवाडीत 30 लाखांच्या हायवा ट्रकसह चोरीची वाळू जप्त; ट्रक चालकाला अटक तर ट्रक मालक लोणी काळभोरचा, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

रुळी कांचन, (पुणे) : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून बेकायदेशीररीत्या वाळूची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 5 ब्रास वाळू आणि हायवा ट्रक असा एकूण 30 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील ‘आल्फा’ पेट्रोल पंपासमोर सोलापूर बाजूकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर केली.

याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल रविकुमार फड यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक अर्जुन विष्णू जाधव (वय 41, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) याच्याविरुद्ध चोरी व बेकायदेशीर वाळू वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाचे रात्रगस्त पथक व पोलीस प्राबेशनरी उपधीक्षक भूषण माने हे पथकासह सोलापूर-पुणे महामार्गावर गस्त घालीत होते. यावेळी सोरतापवाडी येथे सोलापूर बाजूकडून पुण्याकडे भरधाव वेगाने जाणारा एक संशयास्पद हायवा ट्रक (क्रमांक MH 12 ZE 2751) त्यांना आढळून आला.

पोलीस पथकाने तात्काळ ट्रक थांबवून चालक अर्जुन जाधव याच्याकडे वाहनातील वाळूबाबत आणि रॉयल्टीबाबत विचारणा केली. मात्र, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची शासकीय रॉयल्टी पावती, चलन किंवा वाहनाची अधिकृत कागदपत्रे नव्हती. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वाळूचे लिलाव बंद असताना ही वाळू नदीपात्रातून चोरून विक्रीसाठी पुण्याकडे नेली जात असल्याचे उघड झाले.

घटनेचे गांभीर्य ओळखून भूषण माने यांच्या पथकाने ‘डायल 112’ गस्तीवर असलेल्या उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मत्रे आणि सहकाऱ्यांनी तात्काळ दोन पंचांना घटनास्थळी बोलावून रीतसर पंचनामा केला.

यावेळी 30 लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक, अंदाजे 50 हजार रुपये किमतीची 5 ब्रास चोरीची वाळू असा तीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान ट्रक चालक अर्जुन जाधव याने कबुली दिली की, हा ट्रक गणेश आबासाहेब काळभोर (रा. लोणी काळभोर, ता. हवेली) यांच्या मालकीचा असल्याची माहिती दिली.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाचे प्राबेशनरी उपविभागीय अधिकारी भूषण माने, आर.टी.पी.सी. पोलीस शिपाई गौरव गुंजेगावकर, कारचालक पो. कॉ. बाळासाहेब कारंडे, अक्षय देवकाते, यश देसाई, रिनेश माहुरे, अनिकेत मगर तसेच उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मत्रे, हवालदार सलीम शेख, रविकुमार फड, सोमनाथ चितारे यांच्या पथकाने केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News