गुजरात: गुजरातमधील सुरत-धुळे महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसांचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर एका बसला आग लागल्याने 8 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Accident News)
ही दुर्घटना सुरत जिल्ह्यातील बारडोलीजवळील उवा गाव परिसरात घडली. प्राथमिक माहितीनुसार, सुरतहून धुळ्याकडे जाणाऱ्या एसटी बसची दुसऱ्या बसशी जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर एक बस दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर जाऊन पलटी झाली.
बस पलटल्यानंतर तिला आग लागली. आग वेगाने पसरल्यामुळे काही प्रवाशांना वेळेत बाहेर पडता आले नाही. त्यामुळे अनेक जण बसमध्येच अडकले. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत बसचे मोठे नुकसान झाले होते. आगीमुळे बस पूर्णपणे जळून खाक झाली असून तिचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे.
या दुर्घटनेत 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच 15 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

