शिरूर : न्यायालयाने दिलेल्या हद्दपारीच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, बंदी घातलेल्या क्षेत्रात बेकायदेशीरपणे वावरणाऱ्या एका आरोपीला शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. योगेश तुकाराम देवकर (वय 30, रा.
कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर मुंबई पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद ज्ञानदेव खटींग यांनी या प्रकरणी रीतसर फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 जुलै रोजी सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास आरोपी योगेश देवकर हा कवठे यमाई गावातच फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला जागेवरच ताब्यात घेतले.
त्यानंतर पोलिसांनी शिरूर पोलीस ठाण्यात आणून त्याच्या गुन्हेगारी रेकॉर्डची आणि तडीपारीच्या कागदपत्रांची कसून पडताळणी केली.
पोलिसांनी केलेल्या तपासणीत धक्कादायक बाब समोर आली. पुणे उपविभागाच्या उपविभागीय दंडाधिकार्यांनी 14 ऑक्टोबर 2025 रोजी एक आदेश जारी केला होता.
या आदेशानुसार योगेश देवकर याला पुढील दोन वर्षांसाठी संपूर्ण पुणे जिल्हा,पुणे शहर व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्र,
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर आणि श्रीगोंदा तालुके या सर्व भागांतून हद्दपार (तडीपार) करण्यात आले होते.
मात्र सक्षम अधिकार्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, आरोपीने या आदेशाचे उल्लंघन केले आणि बंदी असलेल्या क्षेत्रात प्रवेश केला. हा कायदा हातात घेण्याचा प्रकार असल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. क्षेत्रात शांतता राखण्यासाठी पोलीस अशा गुन्हेगारांवर कडक नजर ठेवून आहेत.

