Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचालींची चर्चा सुरू झाली आहे. नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटातील 14 आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटातील एका वरिष्ठ नेत्याने केला आहे.

या संभाव्य पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाकरे गटाकडे सध्या विधानसभेतील 20 आमदार आहेत. त्यापैकी 14 आमदार शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याचा दावा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, या 14 आमदारांची नावे अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाहीत.

या संभाव्य पक्षांतराची जबाबदारी कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन मंत्र्यांवर सोपवण्यात आल्याचेही संबंधित नेत्याने सांगितले आहे. यातील काही आमदारांना सरकारमध्ये महत्त्वाची पदे किंवा चांगली खाती देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. काहींना महामंडळाचे अध्यक्षपद किंवा राज्यमंत्रीपद देण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला होता. हा धक्का ताजा असतानाच आता 14 आमदारांच्या संभाव्य पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाल्याने उद्धव ठाकरे यांच्या गटाची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांसह बंड करत वेगळी भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणात शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. आता पुन्हा आमदारांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

या संभाव्य हालचालींना शिंदे गटाकडून 'ऑपरेशन टायगर' असे नाव दिल्याची चर्चा आहे. मात्र, नेमके कोणते 14 आमदार ठाकरे गट सोडणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आगामी काळात या दाव्याला कितपत दुजोरा मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ठाकरे गटाचे 20 आमदार

ठाकरे गटातील सध्याच्या आमदारांमध्ये सिद्धार्थ खरात, गजानन लवाटे, नितीन देशमुख, संजय देरकर, राहुल पाटील, सुनील राऊत, बाळा नर, सुनील प्रभू, हरुन खान, संजय पोतनीस, वरुण सरदेसाई, महेश सावंत, आदित्य ठाकरे, अजय चौधरी, मनोज जामसूतकर, बाबाजी काळे, प्रवीण स्वामी, कैलास पाटील, दिलीप सोपल आणि भास्कर जाधव यांचा समावेश आहे.

मात्र, यापैकी कोणते आमदार शिंदे गटात जाणार, याबाबत सध्या केवळ दावा आणि राजकीय चर्चा सुरू आहे. अधिकृत पक्षप्रवेश झाल्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News