लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय मार्गावर भरधाव ट्रकने मर्सिडीज बेन्झ कारला धडक देत कारच्या मागील भागाचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. हि घटना कुंजीरवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाट्यावर २८ जुलै रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुसाहिद मुस्लिम अन्सारी (वय २२, मूळ रा. गिरिडीह, झारखंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मनोज नाना गायकवाड (वय ३०, रा. नायगाव, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड हे मासे पुरवठ्याचा व्यवसाय करत असून २८ जुलैला त्यांचा मित्र विशाल दादा चौधरी यांच्या मुलीला एमआयटी कॉलेजमधून घेऊन मर्सिडीज बेन्झ (क्र. MH 48 AK 3693) कारने लोणी काळभोरकडे परत येत होते.
दुपारी साडेतीनच्या सुमारास कुंजीरवाडी येथील थेऊर फाट्याजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या टाटा ट्रक (क्र. WB 89 2744) ने बेदरकारपणे कारला घासून धडक दिली. या धडकेत कारच्या मागील डिकीचे मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर फिर्यादीने ट्रकचा क्रमांक नोंदवून ठेवला. चौकशीअंती ट्रक चालक मुसाहिद अन्सारी असल्याचे समोर आले. त्यानंतर थेऊर चौकीत तक्रार दाखल करण्यात आली.
दरम्यान, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारमधील सर्वजण सुखरूप बचावले. मात्र भरधाव व निष्काळजी वाहनचालना करून अपघात घडविल्याप्रकरणी संबंधित ट्रक चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

