पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडाबळीच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. अशातच आता वाकड येथील एका उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
हुंड्यासाठी आणि संपत्तीच्या हव्यासापोटी एका ३२ वर्षीय विवाहितेने स्वतःचे जीवन संपवल्याचा प्रकार घडला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शिल्पा सचिन गवारे असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. शिल्पा यांचा विवाह वाकड येथील एका उच्चभ्रू कुटुंबात झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्या छळाची मालिका सुरू झाली. पती सचिन गवारे, सासरे आणि दीर हे शिल्पा यांच्याकडे माहेरच्या मालमत्तेतील हिस्सा मागण्यासाठी सातत्याने तगादा लावत होते. माहेरून संपत्ती आणण्यासाठी त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक दबाव टाकला जात होता. यावरून त्यांना सतत मारहाण आणि शिवीगाळ सहन करावी लागत होती, असा गंभीर आरोप त्यांच्या माहेरच्या लोकांनी केला आहे.
सासरच्यांच्या रोजच्या जाचाला आणि कौटुंबिक छळाला कंटाळून अखेर शिल्पा यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी मयत शिल्पा यांच्या भावाने वाकड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. दिलेल्या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी आरोपी पती, सासरे आणि दीर यांच्याविरोधात हुंडाबळी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल केले आहेत. वाकड पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाच्या आदल्या दिवशीच शिल्पा यांनी जगाचा निरोप घेतल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुरोगामी विचारांच्या पुणे शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दोषींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.

