Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता' इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

'त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता' इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

पंजाब: पंजाबमधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरच्या मृत्यूने खळबळ उडाली असून, तिच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या जुन्या मुलाखतीमुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. ३ जुलै रोजी मोरिंडा येथे मनजीत गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत आढळली होती.

तिला झाडाला बांधून मारहाण केल्यानंतर पेटवून दिल्याचा आरोप आहे. तब्बल ५४ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर चंदीगड येथील पीजीआय रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.

मनजीतच्या मृत्यूनंतर तिची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत तिने एका व्यक्तीबद्दल बोलताना आपल्याला त्या नात्यातून मोठा मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे सांगितले होते. मात्र, तिने संबंधित व्यक्तीचे नाव स्पष्ट केले नव्हते.

मनजीतने मुलाखतीत सांगितले होते की, त्या व्यक्तीला तिच्याकडून शरीर आणि पैसे या दोन्ही गोष्टी हव्या होत्या. तिने त्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण केल्या, मात्र तरीही नात्यात तिला अपेक्षित असलेली शांतता मिळाली नाही. आपल्यातील वाद संपवण्यासाठी समोरच्या व्यक्तीने सर्व गोष्टी स्पष्ट कराव्यात, अशी तिची अपेक्षा होती. या परिस्थितीमुळे ती अनेकदा एकटी बसून रडत असल्याचेही तिने सांगितले होते.

विशेष म्हणजे, मनजीतने या मुलाखतीत आपल्याला आता पैसा, पार्ट्या किंवा दिखाऊ आयुष्य नको असल्याचे म्हटले होते. त्याऐवजी शांत आणि स्थिर आयुष्य जगण्याची इच्छा तिने व्यक्त केली होती. तिच्या मृत्यूनंतर हीच मुलाखत पुन्हा चर्चेत आल्याने तिने नेमक्या कोणत्या व्यक्तीबद्दल हे वक्तव्य केले होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मात्र, मुलाखतीतील व्यक्ती आणि मनजीतच्या हत्येप्रकरणातील आरोपी यांचा संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मुलाखतीबाबतही अधिकृतपणे कोणतीही पुष्टी झालेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासातूनच या दोन्ही घटनांमधील संबंध स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, चंदीगड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून सेक्टर-३४ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह अन्य पुरावे तपासले जात आहेत. मनजीतचे अपहरण नेमके कुठून झाले, त्या वेळी तिच्यासोबत कोण होते आणि मोरिंडा येथे तिला झाडाला बांधून जाळण्यामागे नेमके कारण काय होते, या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे बाकी आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News