Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उरुळी कांचनच्या डॉ. सायरस पूनावाला स्कूलचा कबड्डीत डंका ; प्रादेशिक स्पर्धेत मुलींचा संघ ठरला 'चॅम्पियन', तर मुलांनी पटकावले उपविजेतेपद..

उरुळी कांचनच्या डॉ. सायरस पूनावाला स्कूलचा कबड्डीत डंका ; प्रादेशिक स्पर्धेत मुलींचा संघ ठरला 'चॅम्पियन', तर मुलांनी पटकावले उपविजेतेपद..

रुळी कांचन : येथील डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुला-मुलींच्या कबड्डी संघांनी प्रादेशिक कबड्डी स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी बजावत क्रीडा यशाची परंपरा उज्ज्वल केली आहे.

या स्पर्धेत मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात विरोधी संघाचा धुव्वा उडवत विजेतेपद (चॅम्पियनशिप) पटकावले, तर मुलांच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारून उपविजेतेपदावर आपले नाव कोरले. 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान शिर्डी (जि. संभाजीनगर) येथे या प्रादेशिक स्तरावरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेत सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवणाऱ्या मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात उत्कृष्ट पकड आणि चपळ चढायांचे प्रदर्शन करत दणदणीत विजय मिळवला. विजयी मुलींच्या संघाचे नेतृत्व कर्णधार मनस्वी गोरे हिने केले. तिला संघातील खेळाडू श्रेया मनोज शिंदे, ईश्वरी भूषण शिंदे, मनस्वी बाबते, अक्षिता चौधरी, तेजस्वी पवार, श्रावणी तुपे, श्रावणी चौधरी, आराध्या परीट आणि आदिती चव्हाण यांनी उत्कृष्ट साथ देत संघाला विजेतेपद मिळवून दिले.

दुसरीकडे, मुलांच्या संघानेही प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. अत्यंत अटीतटीच्या आणि थरारक झालेल्या अंतिम सामन्यात मुलांच्या संघाला अवघ्या काही गुणांच्या फरकाने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र, प्रादेशिक स्तरावर अंतिम फेरी गाठण्याची ही कामगिरी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे. मुलांच्या संघाचे नेतृत्व कर्णधार वेदांत सूर्यवंशी याने केले. त्याला श्लोक अमित शिंदे, स्वराज खुणे, श्रीराज कुबेर, देव कुंभार, मयुरेश चव्हाण, वेदांत बोरकर, निशांत गायकवाड, विराज म्हस्के आणि आरुष मलभारे यांनी मोलाचे योगदान दिले.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे कबड्डी प्रशिक्षकांचे परिश्रम, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शन कारणीभूत ठरले. त्यांनी खेळाडूंचा कसून सराव करून घेत त्यांच्यात आत्मविश्वास आणि विजयी वृत्ती निर्माण केली. या कार्यात शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. 25 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना चषक व पदके देऊन गौरवण्यात आले.

दरम्यान, “मैदानावरील संघर्ष, संघभावना, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे,” अशा शब्दांत आनंद व्यक्त करत शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक आणि उरुळी कांचन परिसरातील क्रीडाप्रेमींनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News