Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वाकड पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल १५.५० लाखांच्या २५ दुचाकी जप्त; १७ गुन्हे उघडकीस

वाकड पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल १५.५० लाखांच्या २५ दुचाकी जप्त; १७ गुन्हे उघडकीस

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील वाहनचोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्याच्या मोहिमेत वाकड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. वाहनचोरी करणाऱ्या तीन संशयितांना अटक करत पोलिसांनी तब्बल १५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या २५ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

या कारवाईमुळे पुणे आणि रायगड जिल्ह्यातील एकूण १७ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, एका आरोपीने केवळ मौजमजेसाठी वाहने चोरत असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये ज्ञानेश्वर शंकरराव जैसवाल (वय ४६, रा. आळंदी देवाची), वेदप्रकाश मदनसिंग रावत (वय ३५, रा. ताथवडे) आणि संतोष मोहन मांगिलवाड (वय २८, रा. वाकड) यांचा समावेश आहे.

पोलिस उपायुक्त प्रदीप जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचोरीच्या विविध गुन्ह्यांचा तपास करताना वाकड पोलिसांच्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. या तपासादरम्यान १ ऑगस्ट रोजी ज्ञानेश्वर जैसवाल याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याच्याकडून तब्बल २३ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.

यानंतर दुसऱ्या प्रकरणात २ ऑगस्ट रोजी वेदप्रकाश रावत याला अटक करून त्याच्याकडून एक चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली. तसेच संतोष मांगिलवाड यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून आणखी एक चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली. अशाप्रकारे तिन्ही आरोपींकडून एकूण २५ दुचाकी जप्त करण्यात आल्या.

तपासादरम्यान ज्ञानेश्वर जैसवाल हा खासगी वाहनांवर बदली चालक म्हणून काम करत असल्याचे समोर आले. तो मौजमजेसाठी दुचाकी चोरत असे आणि वापरून झाल्यानंतर त्या विविध ठिकाणी बेवारस अवस्थेत सोडून देत असल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कारवाईमुळे वाकड, आळंदी, चाकण, देहूरोड, तळेगाव दाभाडे, संत तुकारामनगर, सिंहगड तसेच रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १७ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच आठ दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध अद्याप सुरू आहे.

दरम्यान, चोरीची वाहने खरेदी-विक्री करणारे तसेच वाहनांची बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या व्यक्तींचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त प्रदीप जाधव, सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे आणि त्यांच्या तपास पथकाने केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News