तेहरान: आखाती देशांमधील युद्धाचा भडका आता अशा वळणावर आला आहे, जिथून परतणे अशक्य वाटते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली मुदत आता काही तासांवर येऊन ठेपली आहे.
जर इराणने शरणागती पत्करली नाही, तर इराणमधील वीज प्रकल्प आणि पुलांसह सर्व पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याची थेट धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. मात्र, या विनाशाच्या सावटाखालीच पडद्यामागे ’45 दिवसांच्या युद्धविरामा’साठी जोरदार हालचाली सुरू आहेत.
डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांची आक्रमक जोडी इराणला गुडघ्यावर आणण्यासाठी सज्ज असतांना ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर जाहीर केल्याप्रमाणे, ही मुदत मंगळवारी रात्री 8 वाजता संपणार आहे. इराणने नमती भूमिका न घेतल्यास अमेरिका आणि इस्रायल इराणवर मोठा बॉम्बहल्ला करण्याची शक्यता आहे.वृत्तानुसार, पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की हे देश मध्यस्थी करत आहेत. चर्चेनुसार…
१. 45 दिवसांचा तात्पुरता युद्धविराम: या काळात दोन्ही बाजू शस्त्रे खाली ठेवतील.
२. कायमस्वरूपी तोडगा: ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ पूर्णपणे पुन्हा खुला करणे, इराणचे युरेनियम देशाबाहेर पाठवणे किंवा त्याचे विरलीकरण करणे यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.
जर ही चर्चा फिसकटली, तर त्याचे परिणाम केवळ इराणपुरते मर्यादित राहणार नाहीत. इराणनेही इशारा दिला आहे की, जर त्यांच्यावर हल्ला झाला, तर ते इस्रायलसह संपूर्ण आखाती देशांमधील तेल आणि पाणी पुरवठा यंत्रणा उद्ध्वस्त करतील. यामुळे जागतिक स्तरावर इंधन टंचाई आणि महागाईचा भडका उडू शकतो.
पुढील 48 तास जागतिक राजकारणासाठी अत्यंत निर्णायक आहेत. ट्रम्प यांचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे अब्बास अराघची यांच्यातील चर्चेमुळे या युद्धाचे भवितव्य अवलंबून आहे. इराणला गाझा किंवा लेबनॉनसारखी परिस्थिती नको आहे, जिथे युद्धविराम असूनही हल्ले सुरू राहतात. त्यामुळे ते ‘लेखी हमी’साठी आग्रही आहेत. दरम्यान, काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

