Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आत्मा' अंतर्गत मुरुडच्या 25 शेतकर्‍यांना मत्स्यबीजांचे वितरण

आत्मा' अंतर्गत मुरुडच्या 25 शेतकर्‍यांना मत्स्यबीजांचे वितरण

कोर्लई । कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत राबविण्यात येणार्‍या कृषी संलग्न प्रात्यक्षिक कार्यक्रमाअंतर्गत मुरुड तालुक्यातील 25 शेतकर्‍यांना रोहु, कटला आणि सायप्रिन या जातींच्या मत्स्यबीजांचे वितरण करण्यात आले.

प्रत्येक लाभार्थी शेतकर्‍यास एक हंडी या प्रमाणे मत्स्यबीजांचे वाटप करण्यात आले असून, या उपक्रमामुळे तालुक्यात मत्स्यपालन व्यवसायाला नवी चालना मिळणार आहे. मत्स्यबीज वितरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या ज्योती नागावकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रमोद नरळे, कृषी सेवक प्रदीप मालचे तसेच तालुक्यातील लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मत्स्यपालन हा शेतीला पूरक, कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय असल्याचे सांगितले. शेतकर्‍यांनी शास्त्रोक्त पद्धतीने मत्स्यपालन करत शेततळे, सिंचन तलाव आणि इतर उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.

तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन मत्स्यपालन व्यवसायाचा विस्तार करण्यावरही भर देण्यात आला. मत्स्यपालनामुळे शेतीसोबत अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो. कृषी आणि मत्स्यपालन यांचा समन्वय साधल्यास शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढण्याबरोबरच ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतात, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे नियोजन आणि मत्स्यबीज वितरण यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमामुळे मुरुड तालुक्यात मत्स्यपालन व्यवसायाला प्रोत्साहन मिळून शेतकर्‍यांच्या आर्थिक सक्षमीकरणास हातभार लागेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Raigad Times