Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बौद्धिक दिव्यांग तरुणीवरील अत्याचारप्रकरणी;आठ संशयितांचे डीएनए नमुने निगेटीव्ह

बौद्धिक दिव्यांग तरुणीवरील अत्याचारप्रकरणी;आठ संशयितांचे डीएनए नमुने निगेटीव्ह

वीन पनवेल | बौद्धिक दिव्यांग तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर ती गर्भवती राहिली आणि तिने एका मुलीला जन्म दिल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात जून महिन्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात पोलिसांनी आठ संशयितांचे डीएनए नमुने घेत ते तपासणीसाठी कलिना येथील प्रयोगशाळेत पाठविले होते.

मात्र, ऑगस्ट महिन्यात प्राप्त झालेल्या अहवालानुसार आठही संशयितांचे डीएनए नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रकरणातील खर्‍या आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे. पनवेल तालुक्यातील २४ वर्षीय बौद्धिक दिव्यांग तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. उपचारादरम्यान ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.

आरोपीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी पीडितेच्या संपर्कात आलेल्या तसेच तिच्या वास्तव्याच्या परिसरातील संशयित व्यक्तींची माहिती संकलित केली. या तपासादरम्यान आठ संशयित व्यक्तींचे डीएनए नमुने घेण्यात आले. हे नमुने तपासणीसाठी कलिना येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. काही दिवसांनंतर प्राप्त झालेल्या अहवालात सर्व आठही संशयितांचे डीएनए नमुने निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे आतापर्यंत तपासाच्या कक्षेत असलेल्या व्यक्तींपैकी कोणाचाही या गुन्ह्याशी संबंध सिद्ध झालेला नसल्याने पोलिसांचा तपास अधिक व्यापक करावा लागणार आहे. आठही संशयितांचे नमुने निगेटिव्ह आल्याने प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. पोलिसांकडून आता पीडित तरुणीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती, संबंधित घटनाक्रम आणि उपलब्ध पुरावे यांची पडताळणी केली जात आहे.

तसेच अन्य संशयित व्यक्ती, त्यांच्या हालचाली आणि संभाव्य संबंध याबाबतही तपास सुरू आहे. या गंभीर प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसून, त्याचा शोध घेण्यासाठी विविध शक्यता तपासल्या जात आहेत. गरज भासल्यास आणखी संशयितांची चौकशी करून त्यांचे डीएनए नमुने तपासणीसाठी घेण्याची शक्यता आहे. पीडित तरुणीने एका मुलीला जन्म दिल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेणार्‍या आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आठ संशयितांचे डीएनए नमुने निगेटिव्ह आले असले तरी तपास थांबलेला नसून, उपलब्ध पुरावे आणि नव्या संशयितांच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष डीगे पुढील तपास करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Raigad Times