Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कर्जत | मावशीकडे पाहुणा आलेल्या तरुणाचा उल्हास नदीत बुडून मृत्यू

कर्जत | मावशीकडे पाहुणा आलेल्या तरुणाचा उल्हास नदीत बुडून मृत्यू

र्जत | नेरळ परिसरातील उल्हास नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रचित दत्तात्रय देशमुख (वय १७, रा.सवणे, ता.खालापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

नुकताच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला प्रचित सुट्टीच्या निमित्ताने नेरळ येथे आपल्या मावशीकडे आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (१७ मे) दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास नेरळ येथील हेटकरआळी परिसरात राहणार्‍या आपल्या मावशी व काका रामदास शिंदे यांच्या घरी आलेला प्रचित हा मावशी, काका तसेच शेजारील कुटुंबीयांसोबत नेरळ- कळंब राज्य मार्गावरील दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील मौजे बिरदोले परिसरातील बारमाही वाहणार्‍या उल्हास नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेला होता.

दरम्यान, काहीजण नदीकाठी कपडे धूत असताना प्रचित हा पोहण्यासाठी नदीत उतरला. मात्र नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याने स्वतःला वाचवण्यासाठी हाकही मारली. यावेळी मावशीने स्वतः तसेच शेजारील अरुण गावंडा यांनी त्याला वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र काही क्षणांतच प्रचित पाण्यात दिसेनासा झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

स्थानिक नागरिक व नातेवाईकांनी तात्काळ शोधमोहीम सुरु केली. सुमारे दीड तासाच्या प्रयत्नानंतर प्रचित याचा मृतदेह नदीबाहेर काढण्यात आला. त्यानंतर तुंगेकर यांच्या रुग्णवाहिकेतून त्याला तातडीने नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Raigad Times