Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
खारघरच्या डोंगररांगांत धावला उत्साह! खारघर हिल मॅरेथॉनला विक्रमी प्रतिसाद

खारघरच्या डोंगररांगांत धावला उत्साह! खारघर हिल मॅरेथॉनला विक्रमी प्रतिसाद

नवेल | पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'खारघर हिल महापौर मॅरेथॉन'मध्ये सुमारे नऊ हजार धावपटूंनी सहभाग नोंदविला. ४२ किलोमीटरची पूर्ण हिल मॅरेथॉन, २१ किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन, तसेच १०, ५ आणि ३ किलोमीटरच्या धावण्याच्या प्रकारांमुळे या स्पर्धेला व्यापक प्रतिसाद मिळाला.

रविवारी (२३ ऑगस्ट) पहाटे साडेचार वाजता आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, मुख्य प्रवर्तक परेश ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावळे, आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख आणि महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी सभागृह नेते प्रकाश बिनेदार, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण समिती सभापती ममता प्रितम म्हात्रे, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे आदी उपस्थित होते.

खारघरच्या डोंगराळ परिसरातून जाणारा चढ-उतारांचा मार्ग आणि प्रदीर्घ अंतर यामुळे ४२ किलोमीटरची शर्यत सहभागी धावपटूंच्या शारीरिक क्षमता, सहनशक्ती आणि क्रीडाकौशल्याची खरी कसोटी ठरली. दुसरीकडे ३ आणि ५ किलोमीटरच्या प्रकारांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील नागरिकांनी सहभागी होत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला. सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी यांच्या उपस्थितीने स्पर्धेचा उत्साह आणखी वाढला.

त्यांनी धावपटूंना प्रोत्साहन देत स्पर्धेच्या प्रारंभी सहभाग घेतला. त्यांच्या उपस्थितीमुळे तरुणांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. अधिकारी, विद्यार्थीही धावले. नवी मुंबईचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, माजी आयुक्त सुधाकर देशमुख, ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधावर, उपजिल्हाधिकारी राहुल सूर्यवंशी, युवराज बनगर, ठाणे पोलीस उपायुक्त शैलेश काळे आणि महापालिका उपायुक्त जयंत जावडेकर यांच्यासह अनेक अधिकारी शासकीय अधिकारी, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, खासगी कंपन्यांमधील कर्मचारी, विद्यार्थी, सहभागी झाले.

सुमारे नऊ हजार धावपटूंचा सहभाग, डोंगराळ भूभागातील ४२ किलोमीटरची शर्यत आणि आंतरराष्ट्रीय मान्यतेमुळे 'खारघर हिल महापौर मॅरेथॉन'ने पनवेलच्या क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठसा उमटविला आहे. खारघरच्या डोंगररांगांतून एकाच वेळी धावलेल्या हजारो पावलांनी पनवेलच्या क्रीडा विश्वाला नव्या पर्वाची दिशा दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Raigad Times