Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
म्हसळ्यातील राजकारणाने वरिष्ठही चक्रावले ! पुन्हा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी सामना

म्हसळ्यातील राजकारणाने वरिष्ठही चक्रावले ! पुन्हा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी सामना

म्हसळा | म्हसळा शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट सामना रंगणार आहे. काही दिवसांपूर्वी चार दिवस नगराध्यक्ष राहिल्यानंतर शाहिद जंजिरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी पुन्हा निवडणूक जाहीर झाली असून १ जून रोजी मतदान आणि निकाल होणार आहे.

सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील शेडगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने तसेच महायुतीतील चर्चेनुसार समन्वय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र अंतिम क्षणी शिवसेना (शिंदे गट) शहराध्यक्ष सुफियान हळदे यांनी अर्ज दाखल करून निवडणुकीला अनपेक्षित वळण दिले. यामुळे म्हसळा नगरपंचायतीत पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे.


या लढतीमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले असून स्थानिक राजकारणात मोठी अस्थिरता निर्माण झाल्याचे चित्र आहे. सुफियान हळदे यांना काँग्रेसचे डॉ.मोईज शेख तसेच काही स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असल्याने ही निवडणूक अधिक चुरशीची बनली आहे.दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेडगे हे अनुभवी उमेदवार मानले जात असून त्यांना पक्षातील एकसंध पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतून नगराध्यक्ष राहिलेले शाहिद जंजिरकर हे यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या अर्जावेळी उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यामुळे स्थानिक राजकारणातील गटबाजी आणि बदलते समीकरणे अधिक स्पष्टपणे समोर येत आहेत. सध्या शिवसेनेकडे १० नगरसेवकांचे बळ असून राष्ट्रवादीकडे ६ नगरसेवक असल्याची स्थिती आहे.

मात्र या आकड्यांमध्ये मतदानाच्या दिवशी क्रॉस वोटिंग किंवा गटबाजीचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १ जून रोजी होणार्‍या या निवडणुकीत एकूण १६ नगरसेवकांचे मतदान निर्णायक ठरणार आहे. सुफियान हळदे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात की निवडणुकीच्या मैदानात उतरून महायुतीत आणखी एक राजकीय भूकंप घडवतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. म्हसळ्यातील ही निवडणूक केवळ नगराध्यक्ष पदापुरती मर्यादित न राहता आगामी स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Raigad Times