Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पालकमंत्रीपदावरून आ.महेंद्र दळवींनी खा.तटकरेंना सुनावले

पालकमंत्रीपदावरून आ.महेंद्र दळवींनी खा.तटकरेंना सुनावले

लिबाग | रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटून हे पद शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना मिळाले आहे. पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानले आहेत.

मात्र, शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची तटकरेंवरील नाराजी अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्रीपदाचा निर्णय तटकरेंमुळेच रखडला होता, असा थेट आरोप दळवींनी केला आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून रस्सीखेच सुरू होती. विधान परिषदेच्या निवडणुकीतील तडजोडीनंतर अखेर रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेचे भरत गोगावले यांना देण्यात आले.

त्यानंतर गोगावले आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांची भूमिका काहीशी शांत झाल्याचे चित्र आहे. मात्र, रामदास कदम आणि महेंद्र दळवी यांनी तटकरे यांच्यावर टीकेची धार कायम ठेवली आहे. गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळण्यात आपलाही सहभाग असल्याचे तटकरे यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर दळवींनी जोरदार पलटवार केला. "पालकमंत्रीपदाचे श्रेय कशासाठी घेताय? तुमच्यामुळेच ते रखडले होते," असा थेट सवाल करत दळवींनी तटकरेंवर निशाणा साधला.

याचवेळी दळवींनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. "राष्ट्रवादी हा नेहमी खोडा घालणारा पक्ष आहे. राष्ट्रवादीला आम्ही गणतीत पकडत नाही," असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा उफाळून आले आहेत. दळवींनी भाजपसोबतच्या संबंधांबाबतही सूचक वक्तव्य केले. "भाजप आणि आमचे विचार जुळतात" असे सांगत त्यांनी महायुतीतील आगामी राजकीय समीकरणांचे संकेत दिले.

त्यामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला असला, तरी त्यावरून सुरू झालेला श्रेयवाद आणि त्यातून निर्माण झालेला राजकीय संघर्ष अद्याप थांबलेला नाही. तटकरे आणि शिवसेना नेत्यांमधील वाढता वाद आगामी काळात कोणते वळण घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Raigad Times