Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पनवेल । आयफोनच्या हप्त्यावरुन मित्राची हत्या; तरुण अटकेत

पनवेल । आयफोनच्या हप्त्यावरुन मित्राची हत्या; तरुण अटकेत

पनवेल । पनवेलमध्ये मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आयफोनच्या ईएमआयचे (हप्ते) पैसे भरण्यावरुन झालेल्या वादातून 12 वर्षांपासूनच्या जिवलग मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्रतिक आंबवले (रा. कोपरी गाव) असे मृत तरुणाचे नाव असून, प्रतीक जाधव (रा.उसर्ली) असे खुनी मित्राचे नाव आहे. या घटनेमुळे पनवेल परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रतिक आंबवले याने आयफोन खरेदी केला होता. मात्र, मोबाईलचे मासिक हप्ते भरण्यासाठी त्याने आपला मित्र प्रतिक जाधव याचा मोबाईल क्रमांक आणि नाव दिले होते.

काही काळानंतर हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीकडून प्रतिक जाधव याला वारंवार फोन करून पैशांसाठी तगादा लावण्यात येत होता. याच कारणावरून दोघांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान, 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पनवेलमधील शिवकर गावात एका शाळेमागे दोघेही दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी आयफोनच्या हप्त्यांवरून पुन्हा एकदा त्यांच्यात वाद झाला.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात प्रतिक जाधव याने प्रतिक आंबवले याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. या घटनेनंतर बेपत्ता तरुणाच्या शोधासाठी कोपरी पोलिसांनी तपास सुरु केला असता संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित प्रतिक जाधव याला अटक केली आहे.

याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पनवेल गुन्हे शाखा एसीपी मयुर भुजबळ यांनी दिली आहे. केवळ मोबाईलच्या हप्त्यांवरून 12 वर्षांची घट्ट मैत्री रक्तरंजित संघर्षात संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. क्षुल्लक आर्थिक वादातून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याने मैत्रीच्या नात्यालाच काळीमा फासणारी ही घटना ठरली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Raigad Times