Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पनवेल महापालिकेची तयारी ; पीओपी मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावात

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पनवेल महापालिकेची तयारी ; पीओपी मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावात

नवेल । आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक, न्यायालयीन निर्देशांनुसार तसेच नागरिकांच्या दृष्टीने सुरक्षित व सुव्यवस्थित पद्धतीने साजरा व्हावा, या उद्देशाने पनवेल महानगरपालिकेतर्फे सोमवारी (3 ऑगस्ट) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मूर्तिकार, मूर्ती विक्रेते, स्वयंसेवी संस्था व पर्यावरण क्षेत्रातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पर्यावरण विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांनी न्यायालयीन आदेश तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने गणेशोत्सवासंदर्भात जारी केलेल्या शासन निर्णयातील महत्त्वपूर्ण निर्देशांची माहिती दिली. घरगुती तसेच सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या सर्व पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करावे, असे स्पष्ट करण्यात आले.

तसेच पीओपी मूर्तींच्या उत्पादक व विक्रेत्यांनी प्रत्येक मूर्तीच्या मागील बाजूस ऑईल पेंटने लाल रंगाचे गोल चिन्ह करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. यामुळे ग्राहकांना मूर्तीचा प्रकार सहज ओळखता येणार असून, विक्रेत्यांनी मूर्ती विक्रीवेळी विसर्जनासंदर्भातील शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती ग्राहकांना देण्याचेही निर्देश देण्यात आले. पनवेल महापालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत "उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा" या संकल्पनेअंतर्गत पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात येणार्‍या गणेशोत्सव स्पर्धेची माहितीही यावेळी देण्यात आली.

बैठकीला उपमहापौर प्रमिला रविनाथ पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती अध्यक्ष बबन मुकादम, महिला व बालकल्याण समिती सभापती ममता प्रीतम म्हात्रे यांच्यासह पर्यावरण विभागाचे उपआयुक्त स्वरूप खारगे, सहाय्यक आयुक्त बाळाराम रातांबे. विभागप्रमुख मनोज चव्हाण, पर्यावरण विभागाचे प्रवीण व्हळगल तसेच पनवेल महापालिका क्षेत्रातील मूर्तिकार, मूर्ती विक्रेते आणि विविध सामाजिक व पर्यावरणप्रेमी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत बैठकीत विविध स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी संघटना आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी कृत्रिम तलावांची प्रभावी व्यवस्था, व्यापक जनजागृती, पर्यावरणपूरक मूर्तींचा अधिकाधिक वापर आणि विसर्जन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याबाबत विविध सूचना मांडल्या. तसेच पीओपी मूर्तींसंदर्भातील शासनाच्या निर्देशांबाबत अधिक स्पष्टीकरण देण्याची मागणी मूर्तिकार व विक्रेत्यांनी केली. पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व मूर्तिकार व मूर्ती विक्रेत्यांचे सर्वेक्षण करून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा तसेच शाडू मातीच्या मूर्ती तयार करणार्‍या मूर्तिकारांसाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित करावी, अशी मागणीही उपस्थितांनी केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Raigad Times