Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सहा उमेदवार, १२ नामांकन अर्ज दाखल ; अनिकेत तटकरे, बाळ माने, अरविंद म्हात्रे यांचे अर्ज दाखल

सहा उमेदवार, १२ नामांकन अर्ज दाखल ; अनिकेत तटकरे, बाळ माने, अरविंद म्हात्रे यांचे अर्ज दाखल

त्नागिरी | स्थानिक स्वराज संस्थांमधून निवडल्या जाणार्‍या कोकणातील जागेसाठी शेवटच्या दिवसापर्यंत सहा जणांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.

यात महायुतीकडून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, महाआघाडीकडून बाळ माने तर शेकापकडून अरविंद म्हात्रे यांचा समावेश आहे.

विधान परिषदेच्या या जागेसाठी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली महेंद्र दळवी (अपक्ष) यांनी ३० मे रोजी १ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. तर अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (१ जून) सुरेंद्रनाथ यशवंत माने (शिवसेना-ठाकरे गट) यांनी ४, अरविंद पुंडलिक म्हात्रे (पींझट्स अ‍ॅण्ड वर्कस् पार्टी ऑफ इंडिया) यांनी १, मानसी संतोष म्हात्रे (पींझट्स अ‍ॅण्ड वर्कस् पार्टी ऑफ इंडिया) यांनी १, अनिल रमेश चोपडा (अपक्ष) यांनी १ आणि अनिकेत सुनिल तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) ४ अशा ५ उमेदवारांची ११ अशी एकूण ६ उमेदवारांची एकूण १२ नामनिर्दे शन पत्रे दाखल झाली आहेत.

मंगळवारी (२ जून) या नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. तर ४ जून रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यानंतर कोकणातील या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.


आ.महेंद्र थोरवे यांची उपस्थिती चर्चेचा विषय

रत्नागिरी | महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीतील नेते उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री अदिती तटकरे, खा.सुनील तटकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली.

आमदार महेंद्र थोरवे यांनी यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर अनेकदा जोरदार टीका केली होती. त्यामुळे महायुती धर्म पाळण्यासाठी ते एकमेव आमदार उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला. थोरवे यांनी तटकरे यांच्याविरोधातील टीकेची तलवार म्यान केल्याचे स्पष्ट झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती दुसरीकडे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे अद्याप आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

मंत्री भरत गोगावले हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाडमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने रत्नागिरीतील कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नसल्याचे समजते. दरम्यान, अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमातून महायुतीने एकजुटीचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला असला, तरी शिवसेना नेत्यांच्या भूमिकांमुळे राजकीय चर्चांना नव्याने चालना मिळाली आहे.


अश्रू अनावर...

महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी आयोजित सभेत राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजितदादांच्या आठवणीने, मंत्री अदिती तटकरे भावूक झाल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यांच्या भावना अनावर झाल्या. त्यामुळे काही क्षण सभास्थळी भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Raigad Times