नवी मुंबई आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांना थेट मेट्रोने जोडण्याच्या दिशेने गोल्डन लाईनच्या माध्यमातून वेगाने पावले उचलली जात आहेत आणि हा नक्कीच रायगड व मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासाचा एक सुवर्णकाळ म्हणावा लागेल.
एका विमानतळावरून दुसर्या विमानतळावर अवघ्या तीस ते चाळीस मिनिटांत पोहोचता येणार ही कल्पनाच किती सुखावणारी आणि प्रगतीची अचूक साक्ष देणारी आहे.
आजवर दळणवळणाच्या आणि वाहतुकीच्या प्रवासात जे भौगोलिक व तांत्रिक अंतर होते, ते अशा आधुनिक प्रकल्पांमुळे संपुष्टात येत आहे. मानखुर्द ते बेलापूर मेट्रो मार्ग आठच्या रूपाने नव्या विकासाचे दालन खुले होत असून, यामुळे केवळ विमानप्रवाशांचाच वेळ वाचणार नाही, तर या संपूर्ण परिसराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूच्या माध्यमातून मुंबई आणि रायगडमधील अंतर आधीच सुकर झाले आहे, त्यात आता या मेट्रो प्रकल्पाची भर पडल्यामुळे प्रवासाचा वेग अधिक प्रखर होईल यात शंका नाही.
सिडकोच्या माध्यमातून आकार घेत असलेली नवी मुंबई, उलवे, पनवेल आणि तिसरी मुंबई ही शहरे भविष्यातील जागतिक केंद्र बनण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, या सर्व प्रगतीच्या चक्रात एका अत्यंत महत्त्वाच्या आणि मूलभूत प्रश्नाकडे लक्ष वेधणे आता अनिवार्य बनले आहे, तो प्रश्न म्हणजे अलिबाग आणि मुंबई यांच्यातील थेट रेल्वे कनेक्टिव्हिटीचा अभाव.
नवी मुंबई आणि मुंबई विमानतळांना मेट्रोने जोडण्याच्या घोषणा होत असताना आणि कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प कागदावर वप्रत्यक्षात उतरत असताना, रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या अलिबाग शहराला अद्यापही रेल्वेच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतले गेले नाही, हा संशोधनाचा आणि संतापाचा विषय बनला आहे. रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या अलिबागची ओळख आज जागतिक पातळीवर पर्यटनाचे माहेरघर म्हणून आहे.
दरवर्षी लाखो पर्यटक मुंबई, ठाणे, पुणे आणि देशभरातून अलिबागच्या समुद्रकिनार्यांवर व ऐतिहासिक दुर्गांवर फेरफटका मारण्यासाठी येतात. वीकेंडला तर अलिबागकडे जाणार्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात, तासनतास वाहतूक कोंडीचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागतो. मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या या सुंदर किनारपट्टीच्या शहराला मुंबईशी जोडण्यासाठी रेल्वे मार्ग असणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी आणि अपरिहार्य गरज आहे.
परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे कि स्वातंत्र्याची साडेसात दशके लोटून गेल्यानंतरही अलिबाग रेल्वेच्या नकाशावर ठळकपणे झळकलेले नाही. या संदर्भातील सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे, अलिबाग तालुक्यातील आरसीएफ थळ (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलाइजर्स) प्रकल्पासाठी गेली चार तपे, म्हणजेच तब्बल चाळीस वर्षांहून अधिक काळ मालवाहू रेल्वे अहोरात्र चालू आहे.
थळ कारखान्यात माल ने-आण करण्यासाठी रेल्वे रुळांचे जाळे विणले गेले, मालगाड्या नियमितपणे धावत राहिल्या, पण याच थळवरून आणि अलिबागवरून प्रवास करणार्या सामान्यांसाठी, चाकरमान्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी व रुग्णांसाठी मात्र प्रवासी रेल्वेची सुविधा आजतागायत उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. मालवाहतुकीसाठी रेल्वेमार्ग असू शकतो, कारखान्यांच्या फायद्यासाठी लोहमार्गाचा वापर होऊ शकतो, मग याच परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या आणि प्रवाशांच्या हक्काच्या वाहतुकीसाठी प्रवासी रेल्वे का सुरू केली जात नाही? हाच आजच्या घडीचा सबसे मोठा आणि कळीचा मुद्दा आहे, ज्यावर केवळ चर्चा करून चालणार नाही तर आता तीव्रतेने जाब विचारण्याची वेळ आली आहे.
मालवाहतूक फायदेशीर ठरते आणि प्रवासी वाहतूकत तुटवटा येतो, हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळण्यासारखा आहे, कारण लोककल्याणकारी राज्यात जनसामान्यांची सुखसोय ही सर्वोच्च प्राधान्याची असायला हवी. रायगड जिल्हा हा औद्योगिक, कृषी आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत सधन जिल्हा आहे. पेण, रोहा, माणगाव, महाड हा भाग कोकण रेल्वेने जोडलेला आहे, पनवेल हे रेल्वेचे मोठे जंक्शन बनले आहे, नवी मुंबईत मेट्रो आणि उपनगरीय लोकलचे जाळे पसरत आहे, परंतु रायगडचे प्रशासकीय व राजकीय केंद्र असलेल्या अलिबागला मात्र या विकासाच्या वरदहस्तापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
अलिबागहून मुंबईला किंवा ठाण्याला जाण्यासाठी आजही रस्ते मार्गावर किंवा भाऊचा धक्का ते मंडावा जलमार्गावर अवलंबून राहावे लागते. पावसाळ्यात किंवा वादळाच्या काळात सागरी वाहतूक बंद ठेवावी लागते, तर रस्ते मार्गाने जाताना प्रचंड वाहतूक कोंडी आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागतो. जर पेण किंवा रोह्यावरून किंवा थेट रोहा-पेण मार्गावरून अलिबागपर्यंत रेल्वे मार्ग नेला गेला आणि तो मुंबईशी जोडला गेला, तर अलिबाग परिसरातील चित्र पूर्णपणे बदलून जाईल.
शेतकरी आपल्या शेतमाल अवघ्या काही तासांत मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचवू शकतील, तर तरुण-तरुणींना शिक्षणासाठी व रोजगारासाठी मुंबई-नवी मुंबईत येणे-जाणे अत्यंत सुलभ होईल. गेल्या अनेक दशकांपासून अलिबाग-मुंबई रेल्वे मार्गाची मागणी उठवली जात आहे. राजकारण्यांची इच्छाशक्ती आणि प्रशासकीय अनास्था यामुळेच हा महत्त्वाचा प्रश्न वर्षानुवर्षे कागदावरच रखडलेला आहे.
जर आरसीएफ थळसाठी मालवाहतूक रेल्वे अनेक दशकांपासून यशस्वीपणे चालत असेल, तर त्याच भागातून किंवा लगतच्या परिसरातून प्रवासी रेल्वे मार्ग काढणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य अजिबात नाही. फक्त हवी आहे ती राजकीय इच्छाशक्ती आणि जनतेच्या प्रश्नावर ठामपणे उभे राहण्याची नैतिक ताकद. रायगड जिल्ह्याला लाभलेला समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक वारसा यामुळे या प्रदेशात रोजगाराच्या अपार संधी दडलेल्या आहेत.
जर दळणवळणाची साधने मजबूत झाली, तर स्थानिकांना रोजगारासाठी मुंबई किंवा नवी मुंबईवर अवलंबून राहावे लागणार नाही, तर अलिबागमध्येच नवीन उद्योग आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसाय वाढीस लागतील. रेल्वे मार्ग आल्यामुळे केवळ प्रवाशांचाच प्रवास सुखकर होणार नाही, तर मालवाहतुकीसाठी देखील पर्यायी आणि किफायतशीर मार्ग उपलब्ध होईल. हा लढा केवळ एका रेल्वे रुळाचा नाही, तर रायगडच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रगतीचा पाया मजबूत करणारा एक ऐतिहासिक टप्पा आहे.
जर आताही याकडे दुर्लक्ष केले गेले, तर वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाहनांच्या ताणामुळे अलिबागची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल. त्यामुळे भविष्याचा वेध घेऊन प्रशासनाने तातडीने पावले उचलणे हीच काळाची सर्वात मोठी गरज आहे. जोपर्यंत अलिबाग रेल्वेच्या शिट्टीने दुमदुमून जात नाही, तोपर्यंत रायगडचा आणि मुंबईचा विकास खर्या अर्थाने परिपूर्ण झाला असे म्हणता येणार नाही. हा केवळ रेल्वे रुळांचा प्रश्न नसून रायगडच्या आत्मसन्मानाचा आणि विकासाच्या हक्काचा प्रश्न आहे आणि या प्रश्नावर आता कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, हाच संदेश सरकार दरबारी पोहोचणे गरजेचे आहे.

