Thursday, 17 Sep, 5.00 am सामना

क्रीडा
20 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्ड आर्थिक संकटात

कोरोनाच्या काळात इतर ठिकाणचे क्रिकेट बंद असतानाही इंग्लंडमध्ये वेस्ट इंडीज, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय मालिकांचा थरार रंगला, पण तरीही इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्ड आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळेच त्यांनी 20 टक्के अर्थातच 62 कर्मचाऱयांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाचे सीईओ टॉम हॅरिसन यांनी मंगळवारी दिली.

खर्च कमी करणार

टॉम हॅरिसन यांच्याकडून इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या वेबसाईटवर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ते म्हणाले की, इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाचे स्ट्रक्चर व बजेट यांची समीक्षा करण्यात आली. त्यानंतर आमचा खर्च कमी करायला हवा याबाबत बोर्डातील अधिकाऱयांचे एकमत झाले. आमच्याकडून जी बचत करण्यात येणार आहे, त्यामुळे बोर्डातील प्रत्येक विभाग प्रभावित होणार आहे असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

प्रभावित झालेल्यांना मदत करणार

आम्ही 20 टक्के म्हणजेच 62 व्यक्तींना नोकरीवरून काढून टाकणार आहोत. या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली आहे. काही पदांमध्ये बदलही करण्यात येणार आहे. काही पदांसाठी भरतीही करण्यात येणार आहे, पण ही भरती छोटय़ा प्रमाणात असेल. ज्या व्यक्तींना नोकरीवरून काढून टाकण्यात येणार आहे, त्यांना मदतही केली जाईल असे टॉम हॅरिसन यावेळी म्हणाले.

ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानचाही पाय खोलात

याआधी कोरोनाचा फटका क्रिकेट ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही बसला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून काही कर्मचाऱयांना मे महिन्यातच नोकरीवरून काढून टाकले होते. तसेच काही कर्मचाऱयांचे 20 टक्के वेतन कापून टाकण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून घेण्यात आला होता. शिवाय काही कर्मचाऱयांसाठी सुपर मार्केट येथे अस्थायी स्वरूपात नोकरीही शोधण्यात येत होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडूनही पाच व्यक्तींना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे तसेच आणखी काही कर्मचाऱयांनाही नोकरीवरून काढून टाकण्यात येणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top