Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
३१ मे रोजी दुर्मिळ 'ब्ल्यू मून'चा योग; मात्र चंद्र निळा दिसणार नाही!

३१ मे रोजी दुर्मिळ 'ब्ल्यू मून'चा योग; मात्र चंद्र निळा दिसणार नाही!

सामना 4 months ago

येत्या रविवार, ३१ मे २०२६ रोजी आकाशात दुर्मिळ "ब्ल्यू मून" पाहायला मिळणार आहे. या महिन्यातील ही दुसरी पौर्णिमा असल्याने तिला "ब्ल्यू मून" असे संबोधले जाते. याआधी १ मे रोजी पहिली पौर्णिमा झाली होती.

खगोलशास्त्रानुसार कोणत्याही दोन पौर्णिमांमध्ये सुमारे २९ दिवस १२ तास ४४ मिनिटे ३८ सेकंदांचे अंतर असते. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला पौर्णिमा आल्यास त्याच महिन्याच्या शेवटी दुसरी पौर्णिमा येते. अशा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला "ब्ल्यू मून" म्हणण्याची पद्धत आहे.

विशेष म्हणजे "ब्ल्यू मून" म्हणजे चंद्र प्रत्यक्षात निळ्या रंगाचा दिसतो असा त्याचा अर्थ नाही. ३१ मे रोजी दिसणारा चंद्र इतर पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणेच असणार असून तो निळसर दिसणार नाही, असे खगोल अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

पूर्वी हंगामातील तिसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला "ब्ल्यू मून" म्हटले जात असे. काही ठिकाणी एका वर्षात १३ पौर्णिमा आल्यास तेराव्या पौर्णिमेलाही "ब्ल्यू मून" संबोधले जात होते. मात्र सध्या एका महिन्यातील दुसऱ्या पौर्णिमेला "ब्ल्यू मून" म्हणण्याची पद्धत अधिक प्रचलित आहे.

ब्ल्यू मूनचा योग साधारणपणे दर ३० महिन्यांनी येतो. यापूर्वी हा योग ३० ऑगस्ट २०२३ रोजी आला होता, तर पुढील ब्ल्यू मून ३१ डिसेंबर २०२८ रोजी दिसणार आहे.

काही वेळा एका वर्षात दोनदा ब्ल्यू मून येण्याचाही योग जुळून येतो. जानेवारीत पहिला ब्ल्यू मून आल्यास मार्चमध्ये दुसरा ब्ल्यू मून दिसू शकतो. यामागे फेब्रुवारी महिन्याचे कमी दिवस हे कारण असते. असे चक्र साधारण १९ वर्षांनी पुन्हा घडते.

ब्ल्यू मूनची सर्वात जुनी नोंद १५२८ सालातील असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, अशा खगोलीय घटनांभोवती अनेक अंधश्रद्धा पसरवल्या जातात. मात्र ब्ल्यू मून ही केवळ खगोलशास्त्रीय घटना असून नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana