Dailyhunt
आम्हाला पैसे नकोत, अपघाताचे कारण सांगा; एअर इंडिया विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची पंतप्रधान मोदींना विनवणी

आम्हाला पैसे नकोत, अपघाताचे कारण सांगा; एअर इंडिया विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची पंतप्रधान मोदींना विनवणी

सामना 1 week ago

गेल्या वर्षी 12 जून रोजी अहमदाबाद येथून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर लगेच कोसळले होते. या भीषण अपघातात चालक दलासह 260 जणांचा मृत्यू झाला होता. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र ज्यांचे प्राण गेले, त्यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आर्त विनवणी केली आहे.

आम्हाला पैसे नकोत, आम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे. ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक करा, अशी विनवणी शोकाकूल कुटुंबीयांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.

एअर इंडियाचे बोइंग 787 विमान अहमदाबाद येथून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयावर कोसळले. विमान अपघाताची विविध संस्थांमार्फत चौकशी करण्यात आली आहे, मात्र अपघाताला 10 महिने लोटल्यानंतरही विमान अपघातामागील कारण समोर आले नाही. अपघात कशामुळे घडला, हे मृतांच्या कुटुंबीयांना जाणून घ्यायचे आहे. 30 जणांच्या कुटुंबीयांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, कितीही पैसे दिले तरी झालेली पोकळी भरून निघणार नाही. आम्हाला पैसे नकोत. आम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे. अपघात का घडला आणि विमानात तांत्रिक बिघाड होता का हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक करता येणार नसेल तर कमीत कमी पीडित कुटुंबीयांसोबत त्यातील माहिती वैयक्तिकरीत्या उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून आम्हाला सत्य माहिती होईल, अशी विनवणी पंतप्रधान मोदींकडे करण्यात आली आहे.

या पत्राच्या प्रती डीजीसीए, विमान अपघात तपास संस्था 'एएआयबी' तसेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनाही देण्यात आल्या आहेत. एएआयबीने गेल्या वर्षी जुलै महिन्यात अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर केला होता. अंतिम अहवाल या वर्षी जून महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.

एअर इंडियावर कुटुंबीयांचे गंभीर आरोप

पीडित कुटुंबीयांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातून एअर इंडियावर गंभीर आरोप केले आहेत. एअर इंडियाकडून योग्य प्रकारे मदत केली जात नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अपघातात आई गमावणाऱया किंजल पटेल यांनी सांगितले, 'वेबसाईटवर 25 हजार वस्तूंची यादी आहे, मात्र त्याची छायाचित्रे नीट नाहीत. त्यातून काहीच ओळखता येत नाही.' आई, भाऊ आणि मुलीला गमावणारे रोमिन व्होरा यांनी सांगितले, केवळ एकच ई-मेल आयडी पुरवण्यात आला आहे. उत्तर येण्यास 15 दिवस लागतात. डिजिटल वस्तूंची माहिती नसल्यामुळे अनेक कुटुंबीयांना अडचणी येत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana