Thursday, 17 Sep, 5.00 am सामना

क्रीडा
आपल्या देशातच शटलची निर्मिती व्हायला हवी, बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचे स्पष्ट मत

चीनमध्ये शटलची निर्मिती मोठय़ा प्रमाणात केली जाते. त्यामुळे हिंदुस्थानलाही शटलसाठी त्यांच्यावरच अवलंबून राहावे लागते. आता कोरोनाच्या काळात जून महिन्यापासून नव्या शटलचा स्टॉक आलेला नाही. त्यामुळे हिंदुस्थानातील बॅडमिंटनपटूंना आगामी काळात सरावासाठी शटलची कमतरता भासू शकते. त्यामुळे ऑलिम्पिकसारख्या इतर महत्त्वाच्या स्पर्धांसाठीच्या तयारीला सुरुंग लागू शकतो. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानातील दिग्गज व अनुभवी प्रशिक्षक पुलेला गोपीचंद म्हणाले की, आपल्या देशात शटलची निर्मिती व्हायला हवी. त्यानंतर आपल्याला कोणत्या देशाकडे शटलसाठी हात पसरायची गरज पडणार नाही.

बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनकडून लवकरच कृत्रिम शटलला परवानगी देण्यात येणार आहे. आपणही या शटलची निर्मिती करायला सुरुवात करणे गरजेचे आहे. कृत्रिम शटल आपल्या देशात मिळायला लागल्यास इतर देशांकडून शटल मागण्याची गरज आपल्याला पडणार नाही असे पुलेला गोपीचंद स्पष्टपणे म्हणाले. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पुलेला गोपीचंद यांनी या प्रकरणाबाबत आपले मत व्यक्त केले.

परिस्थिती न सुधारल्यास सराव बंद करावा लागेल

योनेक्स शटलचा वापर हिंदुस्थानात केला जातो. योनेक्स कंपनी ही चीनची नाही, पण शटल बनवण्यासाठी लागणारे साहित्य चीनमध्ये मिळते. तिथून येणाऱया आयातीवर बंदी लावण्यात आलेली आहे. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने याबाबत योनेक्सशी संपर्क साधल्यानंतर आमच्याकडे शटलचा स्टॉक नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आता बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून हे प्रकरण केंद्रीय क्रीडा मंत्रालयापर्यंत नेण्यात आले आहे. आगामी काळात परिस्थितीमध्ये सुधार न झाल्यास राष्ट्रीय बॅडमिंटनचे सराव शिबीर बंद करावे लागेल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top