Dailyhunt
आरे जेव्हीएलआर स्थानकात खासगी गाड्यांच्या पार्किंगचा प्रश्न बिकट; 'ऍक्वा लाईन'च्या मेट्रो भवनसाठी 2028 साल उजाडणार

आरे जेव्हीएलआर स्थानकात खासगी गाड्यांच्या पार्किंगचा प्रश्न बिकट; 'ऍक्वा लाईन'च्या मेट्रो भवनसाठी 2028 साल उजाडणार

सामना 1 week ago

दीड वर्षापूर्वी प्रवासी सेवेत दाखल झालेल्या भुयारी मेट्रो-3 अर्थात 'ऍक्वा लाईन'च्या मेट्रो भवनचे काम रखडले आहे. काही दिवसांपूर्वी मेट्रो भवन बांधकामासाठी ई-निविदा प्रकाशित करण्यात आली आहे.

मात्र नियोजित वेळापत्रकानुसार काम केले तरी मेट्रो भवनचे काम पूर्ण होण्यास 2028 साल उजाडणार आहे. याच मेट्रो भवन प्रकल्पांतर्गत पार्किंग तळ उभारले जाणार आहे. प्रकल्पाच्या रखडपट्टीमुळे सध्या आरे जेव्हीएलआर स्थानकात खासगी गाडय़ांच्या पार्किंगचा प्रश्न बिकट बनला आहे.

ऑक्टोबर 2024 मध्ये आरे जेव्हीएलआर ते बीकेसीपर्यंत भुयारी मेट्रोची प्रवासी सेवा सुरू झाली होती. त्यानंतर गतवर्षीच्या अखेरीस कफ परेडपर्यंत पूर्ण क्षमतेने भुयारी मेट्रो सेवा सुरू झाली आहे. मेट्रोने पश्चिम उपनगरातून दक्षिण मुंबईत जाणारे व्यावसायिक आरे जेव्हीएलआर स्थानकाच्या आवारात कार पार्क करतात. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) या स्थानकात 'पे ऍण्ड पार्क'ची व्यवस्था केली आहे. या सुविधेचा लाभ प्रवासी घेत आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी ही सुविधा सुरू केली असली तरी स्वतंत्र पार्किंग तळाअभावी सध्या सर्व वाहने मेट्रो स्थानकाकडे येणाऱया रस्त्यावरच दुतर्फा पार्क केली जात आहेत. रोज जवळपास 70 कार तसेच 300 हून अधिक गाडय़ा रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या कराव्या लागत आहेत. वास्तविक, मेट्रो भवनसाठी वितरित केलेल्या 4700 चौरस मीटरच्या भूखंडावर मेट्रो भवन आणि पार्किंग तळ प्रस्तावित आहे. मात्र प्रकल्पाचे काम रेंगाळल्यामुळे येथील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. रस्त्यांची जागाही अपुरी पडत असल्याने कंत्राटदार एजन्सीला अतिरिक्त वाहने शेजारच्या जंगलाच्या भागावर उभी करावी लागत आहेत. सकाळी 11 वाजताच 'पार्किंग फुल्ल'चा फलक लावला जात असल्याने अनेक कारचालकांवर माघारी परतण्याचीही वेळ येत आहे.

30 महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानक परिसरातील पार्किंग तळचे काम मेट्रो भवन प्रकल्पाशी संलग्न आहे. मेट्रो भवनसाठी ई-निविदा 5 मार्च रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. कंत्राटदार नियुक्तीनंतर काम 30 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी तात्पुरती पार्किंग व्यवस्था उपलब्ध केली आहे, असे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले.

पावसाळय़ात गैरसोय होणार

मेट्रो भवन व पार्किंग तळासाठी राखीव ठेवलेल्या जागेवर काही झाडे तसेच मातीचे ढिगारे आहेत. पावसाळय़ापूर्वी या जागेचे सपाटीकरण करण्यात यावे आणि तेथे गाडय़ा पार्किंगसाठी मुभा द्यावी, अशी विनंती कंत्राटदार एजन्सीकडून प्रशासनाला केली जात आहे. सध्या अनेक गाडय़ा जंगलाच्या भागात उभ्या करीत आहोत. पावसाळय़ात तेथे चिखल साचून वाहने पार्क करणाऱया अनेक व्यावसायिक तसेच इतर प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana