Dailyhunt
आशिकी फेम राहुल राॅयवर कर्जाचा डोंगर; एकेकाळी करत होता बॉलिवूडवर राज्य

आशिकी फेम राहुल राॅयवर कर्जाचा डोंगर; एकेकाळी करत होता बॉलिवूडवर राज्य

सामना 1 week ago

शिकी हा चित्रपट 90 च्या दशकात आला. हा चित्रपट आल्यानंतर, राहुल राॅय हा चाॅकलेट बाॅय म्हणून प्रचलित झाला. 'आशिकी'चा ओजी स्टार म्हणून ओळखला जाणारा राहुल, अलीकडेच डॉ. वनिता घाडगे देसाई नावाच्या एका कंटेंट क्रिएटरसोबत एका डान्स व्हिडिओमध्ये दिसला.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आणि तो झटपट व्हायरलही झाला. त्यानंतर मात्र राहुल ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. राहुल आणि वनिता या दोघांनी १९९३ सालातील 'फिर तेरी कहानी याद आयी' या चित्रपटातील 'तेरे दर पे सनम' या गाण्यावर डान्स केला.

आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राहुल रॉय मोठ्या प्रमाणात टीकेचा धनी बनला आहे. अनेक युझर्सनी त्याला 'हे सगळं करायला तुला कशामुळे भाग पडलं?' असा टोमणा मारला. या ट्रोलिंगच्या दरम्यान, राहुल रॉयने आता एक निवेदन जारी करून आपली परिस्थिती स्पष्ट केली आहे. त्याने स्वतःच खुलासा केला की, तो कामाच्या शोधात असल्यामुळे त्याने हा व्हिडिओ बनवला होता. राहुल रॉयने लिहिले, "मी माझे काम प्रामाणिकपणे आणि नम्रतेने करतो. मला काही कायदेशीर बाबींसाठी पैसे द्यावे लागत आहेत, आणि या बाबी आजच्या नाहीत, तर माझ्या ब्रेन स्ट्रोकच्या आधीपासूनच्या आहेत."

यापूर्वी, राहुलने एचटी सिटीशी बोलताना त्या व्हिडिओवर आणि ट्रोलिंगवर मौन सोडले होते. राहुल म्हणाला होता की, व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या बातमीवर त्याचा विश्वास बसत नव्हता. तो म्हणाला, "तो व्हायरल झाला नाही… पण ती एक गरज होती. पण आता मी ते पुन्हा करणार नाही. तुम्हा सर्वांचे आभार."

राहुल रॉय १९९० च्या 'आशिकी' या चित्रपटातून प्रसिद्धीस आला. महेश भट्ट दिग्दर्शित या चित्रपटात राहुल आणि अनु यांची प्रेमकथा दाखवण्यात आली होती. चित्रपटाच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे पुढे त्याचा पुढचा भाग, 'आशिकी २' आला, ज्यात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana