टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि 'बिग बॉस 2' ची स्पर्धक संभावना सेठ हिच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या 10 वर्षांनंतर संभावना आणि तिचा पती अविनाश द्विवेदी यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
संभावनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आई होणार असल्याची घोषणा केली असून, सरोगसीच्या मदतीने हे सुख त्यांना लाभणार असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
संभावना सेठने इंस्टाग्रामवर पती अविनाशसोबतचे काही खास फोटो शेअर करून ही माहिती दिली. या फोटोंमध्ये हे जोडपे एका कल्पक पद्धतीने गरोदरपणाची घोषणा करताना दिसत आहे. त्यांनी हातात घेतलेल्या एका वर्तमानपत्राच्या डमीवर "आम्ही प्रेग्नंट आहोत" अशी हेडलाईन देण्यात आली आहे. यासोबतच तिने बाळाच्या लहान बुटांचा आणि सोनोग्राफीचा फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांचे पाळीव कुत्राही दिसत आहे. या बातमीनंतर सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संभावनासाठी आई होण्याचा हा प्रवास अत्यंत खडतर आणि संघर्षाचा राहिला आहे. यापूर्वी 2024 मध्ये तिला गर्भपाताच्या संकटाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने तिने गर्भधारणा केली होती, मात्र तीन महिन्यांनंतर तिचा गर्भपात झाला. या घटनेने संभावना पूर्णपणे खचून गेली होती आणि तिने आपल्या व्लॉगद्वारे चाहत्यांसमोर आपले दुःख व्यक्त केले होते. अनेक वर्षांची प्रतीक्षा आणि शारीरिक-मानसिक त्रासानंतर आता सरोगसीच्या माध्यमातून तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचे दिवस परतले आहेत. 2016 मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीसाठी हा क्षण अत्यंत भावूक आणि सुखावह ठरला आहे.

