Sunday, 25 Aug, 3.38 am सामना

ठळक बातम्या
अहमदपूर - पावसाअभावी पिके सुकू लागली, वाढत्या तापमानाचा परिणाम

अहमदपूर तालुक्यातील 6 मंडळामध्ये 77230 खरीप भौगोलिक हेक्टर क्षेत्र असून पैकी 70708 खरीप हेक्टरवर पेरणी झाली असून 38238 क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झाली आहे. 7676 क्षेत्रावर कापसाची शेतकऱ्यांनी लागवड केली असून जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे पिके माना टाकू लागली आहेत.

तालुक्यात तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिके धोक्यात आली आहेत. आगामी एक - दोन दिवसात पाऊस पडला नाही तर गंभीर दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. एक महिना पावसाळा शिल्लक असताना अद्याप तलाव, नदी, नाले, विहीरीमध्ये पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यात सिंचनाचा सोयीही उपलब्ध नाहीत त्यामुळे पावसाच्या पाण्याशिवाय पर्याय उरला नाही. पण गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने डोळे वटारल्याने पिकाची अवस्था गंभीर बनली आहे. पिकापुरत्या पडलेल्या थोड्या बहुत पावसामुळे अगोदरच उंची खुंटलेल्या पिकांना जीवदान मिळाले वाटत असतानाच पडत असलेल्या तीव्र उन्हामुळे पिके माना टाकत आहेत. कापूस, सोयाबीन सह मुग, तुर, ज्वारी पिके सुकू लागली आहेत.

सोयाबीन, कापूस लागवडी नंतरही पावसाने दडी मारली होती. परंतु उशिरा आलेल्या पावसाने कसबशी पिके उगवली. परंतु मध्येच दोन - तीन दिवसाचा मध्यम स्वरुपाचा पडलेल्या पावसाने पिकात तण वाढले. पिकापेक्षा तणाची उंची वाढली. शेतातील तण काढणीसाठी तण नाशकावर अमाप खर्च तसेच मजुराद्वारे खुरपणी करून शेत शेतकऱ्यांनी तणमुक्त केले. नंतर रोगराईने पिकावर हल्ला चढवला. त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एकूणच पिकावर खर्च केला. रोग नियंत्रणासाठी कपाशीचा व सोयाबीन, मूग व विविध पिकावर फवारण्या करून शेतकरी डबघाईला आलेल्याचे चित्र दिसत आहे.

हलक्या जमिनीत पेरणी करून आलेली पिके पिवळी पडू लागली आहेत. दररोज सकाळ पासून तीव्र उन्हामुळे जमिनीतील ओलावा संपला आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असताना शेतकरी धडपड करून कीटक नाशकाचा फवारणी करून पिके जगविण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आता निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. फवारणी करून हजारो रुपये खर्च करूनही पावसाअभावी पिके सुकू लागल्याने शेतकऱ्याची तगमग वाढली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top