डोक्यावर आग ओकणारा सूर्य आणि उन्हाळ्यामुळे आटलेले जलस्रोत यामुळे मुरबाडच्या नांदगाव कातकरीवाडीत भीषण पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. घोटभर पाण्यासाठी महिलांना काट्याकुट्यातून मैलभर पायपीट करावी लागत होते.
हे पाहून एका सामाजिक कार्यकर्त्या दाम्पत्याने त्यांच्या मदतीस धाव घेतली आहे. हरेश खापरे आणि अर्चना खापरे असे त्यांचे नाव आहे. या खापरे दाम्पत्याने स्वखर्चाने या कातकरीवाडीत लघु नळपाणी योजना उभारल्याने येथील गावकऱ्यांना थेंब थेंब पाणी मिळणार आहे.
मुरबाड तालुक्यातील नांदगाव येथे कातकरीवाडी आहे. या वाडीत १५० च्या आसपास लोकवस्ती आहे, परंतु येथील लोकांना गेल्या अनेक वर्षांपासून १ किलोमीटरची पायपीट करून विहिरीवरून पाणी आणावे लागत होते. या ठिकाणी पाणी योजना राबवण्यासाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. याचे गांभीर्य लक्षात घेत हरेश खापरे आणि त्यांची पत्नी अर्चना खापरे यांनी एन. के. ग्रुपच्या माध्यमातून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. यानंतर तत्काळ गावात बोअरिंग खोदून पाणी योजना राबवली. या योजनेमुळे महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला असून त्यांना दिलासा मिळाला आहे.
सामाजिक बांधिलकी
मानिवली कातकरीवाडीतही याआधी पाणीटंचाई निर्माण झाली होती. मात्र खापरे दाम्पत्याने कातकरीवाडीतिल पाणी समस्या दूर केली. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. तसेच मुलींच्या लग्नकार्यात मदतीचा हात पुढे करून खापरे दाम्पत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. उन्हाळ्यात पाणी आणण्यासाठी डोंगरदऱ्यांतून वाट काढत पाणी आणावे लागत होते, पण एन. के. ग्रुपमुळे आम्हाला दारात पाणी मिळत असल्याने आम्ही आनंदी आहोत, असे सखुबाई मुकणे यांनी सांगितले.

