Dailyhunt
अजितदादांच्या संशयास्पद अपघात प्रकरणी FIR दाखल करून घेण्याची आणि भाजपचा मुखवटा उतरवण्याची ही योग्य संधी! - संजय राऊत

अजितदादांच्या संशयास्पद अपघात प्रकरणी FIR दाखल करून घेण्याची आणि भाजपचा मुखवटा उतरवण्याची ही योग्य संधी! - संजय राऊत

सामना 1 week ago

जित पवारांच्या अपघाता संदर्भात एफआयआर दाखल करण्याची आणि भारतीय जनता पक्षाचा मुखवटा उतरवण्याची ही योग्य संधी आहे. निवडणूक हे निमित्त असून अजित पवारांच्या संशयास्पद अपघाताचे आणि एफआयआरचे काय झाले हा मुख्य मुद्दा आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.

गुरुवारी सकाळी ते मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होते.

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत केली. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांच्या अपघाता संदर्भात एफआयआर दाखल करा ही मागणी रोहित पवार यांची असून तीच मागणी हर्षवर्धन सपकाळ आणि आकाश मोरे करत आहेत. स्वत: मुख्यमंत्री म्हणतात की, अजित पवार यांच्या अपघाता संदर्भातील सत्य खणून काढू, खोलपर्यंत जाऊन तपास करू. पण खोलपर्यंत जाऊन तपास करण्यासाठी तुम्हाला आधी एफआयआर नोंदवावा लागेल. तुम्ही एफआयआर नोंदवायला तयार नाही, संबंधित विमान कंपनीवर गुन्हा दाखल करायला तयार नाही आणि तुम्ही कसा काय खोलवर जाऊन तपास करणार? असा सवाल राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, खरे म्हणजे ही मागणी सुनेत्रा पवार आणि अजित पवारांच्या दोन्ही चिरंजीवांनी करायला पाहिजे. ती मागणी रोहित पवार, काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे आणि आम्ही सगळे करत आहोत. आकाश मोरे किंवा काँग्रेसच्या मागणीचा विचार झाला तर महाराष्ट्रावर उपकार होतील. कर नाही त्याला डर कशाला… तुम्हाला या संदर्भात खरोखर तपास करायचा असेल तर आधी एफआयआर दाखल करा, त्यापासून लांब कशाकरता पळता. विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करता, पण ज्याला तुम्ही जवळचा सहकारी, जीवाभावाचा मित्र म्हणतात त्याच्या संशयास्पद मृत्यूसंदर्भात तुम्ही गुन्हा का दाखल करत नाहीत?

राष्ट्रवादीची मोठ्या भावाप्रमाणे काळजी घेऊ म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला. मोठा भाऊ असेल तर लहान भावाच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी अधिक व्यवस्थित व्हायला पाहिजे. लहान भावाचा मृत्यू संशयास्पद झाला असे आम्ही मानतो, तर मोठ्या भावाची जबाबदारी जास्त आहे की काटा काढण्यात मोठ्या भावाचा हात आहे? असा सवालही त्यांनी केला.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात सगळ्यांचे एकमत आहे होईल याबाबत शंका वाटत नाही. पण एफआयआर दाखल करण्याची मूळ मागणी ते का सोडत आहेत. एफआयआर दाखल करून घेण्याची आणि भाजपचा मुखवटा उतरवण्याची ही योग्य संधी आहे. निवडणूक हे एक निमित्त आहे. सुनेत्रा पवार प्रचंड मतांनी निवडून येतील हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. अजित पवारांच्या संशयास्पद अपघाताचे आणि एफआयआरचे काय झाले हा मुख्य मुद्दा आहे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana