महात्मा गांधींच्या स्मृतिदिनानिमित्त जगभरातून त्यांना अभिवादन केले जात असतानाच अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात अज्ञातांनी गांधींजींच्या पुतळ्याची विटंबना केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हिंदुस्थानने याचा तीव्र निषेध करत घटनेची चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेचा महापौर ग्लोरिडा परटिडा यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असन या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
उत्तर कॅलिफोर्नियाच्या दाविस शहरातील सेंट्रल पार्कमध्ये महात्मा गांधीजींचा पूर्णाकृती पुतळा आहे. जवळपास 294 किलो ब्रान्झच्या धातूपासून बनवलेला सहा फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापौर ग्लोरिडा परटिडा यांनी दिले आहेत. या घटनेमुळे हिंदुस्थानी समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेबाबत त्यांनी खेद व्यक्त केला. सार्वजनिक संपत्तीच्या नुकसानीची कोणतीही घटना खपवून घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजातील विविधतेचा प्रत्येकाने सन्मान करण्याची गरज आहे. समाजातील आदर्शांचा सन्मान ठेवायला हवा, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक आदर्शांचा आणि विचारांचा मान ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे यातील दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

