Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमित शहा संसदेतून पळून गेले आणि बाहेर भटकताहेत; हे त्यांचे नैतिक अध:पतन; डरपोकपणाचा कळस, संजय राऊत कडाडले

अमित शहा संसदेतून पळून गेले आणि बाहेर भटकताहेत; हे त्यांचे नैतिक अध:पतन; डरपोकपणाचा कळस, संजय राऊत कडाडले

सामना 1 week ago

रीक्षा सुधारणा विधेयकावर संसदेत चर्चा सुरू आहे. तरुणांचे भविष्य ठरवणाऱ्या या विधेयकावर संसदेत ही चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले आहे. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी अमित शहांवर जबरदस्त हल्ला चढवला.

गेल्या 10 दिवसांपासून दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे. अमित शहा एकदाही संसदेच्या सभागृहात आले नाहीत. ते पळून गेले आणि बाहेर भटकत आहेत, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे, अशी टीका संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना केली.

संजय राऊत म्हणाले, देशाचे गृहमंत्री अमित शहा रात्रीच्या अंधारात पुण्यामध्ये उतरले. त्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखलेले आहेत. त्यांना गृहमंत्रीपदावर राहायचा अधिकार नाही. गेले 10 दिवस दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे. अमित शहा एकदाही संसदेच्या सभागृहात आले नाहीत आणि हे बाहेर भटकताहेत, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे.

संसदेमध्ये परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे आणि या पेपरफुटीला देशाचे गृहखाते जबाबदार आहे. मुलांच्या भविष्याचे रक्षण तुम्ही करू शकला नाहीत. उलट विद्यार्थी न्याय मागायला रस्त्यावर उतरले, तेव्हा तुम्ही त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, खिळे लावलेल्या लाठ्या चालवल्या आणि पेलेट गन म्हणजे गोळीबार केला. जेव्हा या विषयावर चर्चेची वेळ आली, तेव्हा अमित शहा हे संसदेतून पळून गेले. ते संसदेतच आले नाहत. हे त्यांचे नैतिक अध:पतन तर आहेच आणि डरपोकपणाचा कळस आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

संसदेत ना पंतप्रधान, ना गृहमंत्री

संसदेमध्ये वंदे मातरमचे विधेयक आले आणि पंतप्रधान गायब. वंदे मातरमवर पंतप्रधानांनी दोन दिवस विशेष अधिवेशन घेतले आणि काँग्रेसवर टीका करणारे मोठे भाषण ठोकले. पण जेव्हा वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या संरक्षणासंदर्भात विधेयक आले तेव्हा पंतप्रधान संसदेत आलेच नाहीत, हा राष्ट्रगीताचा अपमान आहे. याबद्दल त्यांनी माफी मागायला पाहिजे. संसदेत ना गृहमंत्री, ना पंतप्रधान. हे असतात कुठे? हे करतात काय? यांना काम काय आहे? संसद काळात जर पंतप्रधान आणि गृहमंत्री सभागृहात उपस्थित नसतील, तर हे कुठे असतात? हे काय कांड करत असतात? हे देशाचा समजायला हवे, असेही संजय राऊत म्हणाले.

भविष्यात तुम्हाला संरक्षणाची गरज

अमित शहा पुण्यामध्ये आले असून काँग्रेस आणि इतर लोकांनी त्यांच्याविरुद्ध आंदोलन करायचे ठरवले. हा त्यांचा अधिकार आहे. भाजपचे कार्यकर्ते म्हणतात, हिंसेला हिंसेने उत्तर देऊ. तुमच्यात हिंसा करायचा दम आहे का? तुम्ही काय त्यांचे संरक्षण करणार? भविष्यात तुम्हाला संरक्षणाची गरज आहे. लोक रस्त्यावर धरतील तुम्हाला. म्हणून तर अमित शहा पळताहेत इकडून तिकडे तिकडून इकडे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला

2029 पर्यंत मोदी-शहा देशाच्या सत्तेवर नसतील

पंतप्रधान मोदी रात्री 12 वाजता व्हिडीओ टाकतात. दिवसा व्हिडीओ टाकायला, मुलांशी बोलायला घाबरतात आणि तुम्ही आमच्याशी हिंसेच्या गप्पा मारताय. जंतरमंतरला त्या मुलांनी तुम्हाला नमवलं. हजारो, लाखो मुलांनी तुम्हाला गुडघ्यावर आणले. तुम्ही काय हिंसेच्या गप्पा करताय. तुमच्या लाठ्या, काठ्या, बंदुकीच्या गोळ्या खाऊन तरुण वर्ग क्रांती करायला तयार झालेला आहे. तुम्ही आता क्रांतीच्या आड येऊ नका. 2029 पर्यंत मोदी-शहा देशाच्या सत्तेवर नसतील, हे त्यांनी आधी लक्षात घेतले पाहिजे. 2029 सुद्धा उजाडट नाही, त्याआधीच यांचा बाजार उठलेला असेल. गृहखात्याचा लिलाव झालेला असेल, असेही संजय राऊत म्हणाले.

जनरल डायरनंतर जनरल कायर अमित शहा

स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे म्हणत ज्यांनी स्वाभिमानाचा लढा दिला, छातीचा कोट करून ब्रिटिशांशी लढले, मंडालेच्या तुरुंगात गेले, डोंगरीच्या तुरुंगात गेले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारला, जालियनवाला बाग हत्याकांडाचा कडक शब्दात निषेध केला. त्यांच्या नावाचा पुरस्कार ज्यांच्या हस्ते दिला जातोय त्यांनी जंतरमंतर कांड केले. जालियनवाला बागनंतर या देशात कोणते कांड घडले असेल तर ते जंतरमंतर काड आहे. जनरल डायरनंतर जनरल कायर अमित शहा आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार द्यायला तुम्हाला लाज वाटत नाही. यात राजकारण आणू नका म्हणता. हा देशाच्या अस्मितेचा, अभिमानाचा, स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा विषय आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच पुण्यात मोठी आर्मी आणली असून महाराष्ट्राचा सगळा पोलीस फोर्सही आणलेला आहे. कशाला आणि कुणाला घाबरताय तुम्ही? असा सवालही संजय राऊत यांनी केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana