Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, पप्पू यादव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा बिहार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा

अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, पप्पू यादव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा बिहार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा

सामना 1 week ago

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण, बेरोजगारी आणि विद्यार्थी आंदोलकांवरील पोलिसांच्या दडपशाहीच्या निषेधार्थ हजारो विद्यार्थ्यांनी मंगळवारी पाटणा येथे बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर एक विशाल मोर्चा काढला.

नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया आणि इतर विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या या मोर्चाचे नेतृत्व पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव आणि एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड यांनी केले. या आंदोलनादरम्यान पप्पू यादव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

गेल्या महिन्यात नीट पेपरफुटी आणि इतर शैक्षणिक मुद्द्यांवरून झालेल्या आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची तत्काळ सुटका करावी, त्यांच्यावरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत आणि शिक्षण व रोजगार क्षेत्रात योग्य पावले उचलावीत, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

पाटण्यातील गांधी मैदानातून निघालेला हा मोर्चा इन्कम टॅक्स गोलचक्कर परिसरात पोहोचताच पोलिसांनी त्यांना अडवले. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स ओलांडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी झटापटही पाहायला मिळाली.

या मोर्चात सहभागी झालेले खासदार पप्पू यादव यांनी पोलीस आणि सरकारच्या कारवाईचा तीव्र निषेध केला. आपले हक्क आणि न्याय मागणार्‍या विद्यार्थ्यांना थेट तुरुंगात टाकले जात असून पोलिसांकडून त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांना धमकावले जात असल्याचा गंभीर आरोप यादव यांनी केला. देशाचे भविष्य असलेल्या युवा वर्गावर आणि न्याय मागणाऱ्या मुलींवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे सांगत जोपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हा लढा रस्त्यापासून संसदेपर्यंत असाच सुरू राहील, असा इशारा पप्पू यादव यांनी दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana