लखनौमधील क्राइस्ट चर्च कॉलेजची विद्यार्थिनी सारा मोईन हिने सर्व अडथळ्यांना झुगारून बारावीच्या परीक्षेत तब्बल 98.75 टक्के गुण मिळवत यशाची नवी कहाणी रचली आहे. सारा पाहू शकत नाही, तिला ऐकू येत नाही आणि बोलताही येत नाही.
अशा तिहेरी अडचणी असूनही साराने मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
साराला 'सारकॉइडोसिस' या दुर्मीळ आजाराने ग्रासले होते. या आजारामुळे तिची दृष्टी, ऐकण्याची क्षमता आणि बोलण्याची शक्ती हळूहळू कमी होत गेली. मात्र या अडचणींनी तिचा आत्मविश्वास कधीच कमी झाला नाही. दहावीमध्ये 95% गुण मिळवल्यानंतर तिने आणखी मोठे लक्ष्य ठरवले आणि बारावीत कॉलेजमध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
साराला भूगोल आणि मास मीडिया विषयात 100 पैकी 100 गुण, इंग्रजीत 98, इतिहासात 97 आणि मानसशास्त्रात 96 गुण मिळाले आहे. शिक्षक आणि मित्रपरिवार तिला प्रेमाने 'आधुनिक काळातील हेलन केलर' म्हणतात.
साराची अभ्यासाची पद्धतही वेगळी आणि प्रेरणादायी आहे. तिच्या तळहातावर अक्षरे लिहून प्रश्न विचारले जातात आणि ती तत्काळ उत्तर देते. तिच्या शिक्षकांनी तिच्या क्षमतेची दखल घेत 'ऑर्बिट रीडर' या ब्रेल कीबोर्ड असलेल्या विशेष उपकरणाच्या मदतीने तिला शिक्षण दिले.
साराच्या यशामागे तिच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे. वडील मोईन अहमद इद्रिसी यांनी तिच्या शिक्षणासाठी सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. आई जुली हमीद आणि भाऊ झोहेब अहमद यांनीही तिच्या अभ्यासात सातत्याने मदत केली.
साराला सुरुवातीला सर्वसामान्य शाळेत प्रवेश नाकारण्यात आला होता, पण नंतर क्राइस्ट चर्च कॉलेजने तिला विशेष वर्गात प्रवेश दिला आणि तिच्या प्रवासाला नवी दिशा मिळाली.
प्रशासकीय सेवेत जाण्याचे साराचे स्वप्न आहे. तिची जिद्द आणि चिकाटी पाहता हे स्वप्नही नक्कीच साकार होईल, असा विश्वास तिच्या शिक्षकांना आणि कुटुंबियांना आहे.

