Sunday, 29 Mar, 3.20 pm सामना

ठळक बातम्या
बंदीकाळात विद्यार्थ्यांना पालकर सरांच्या 'लाईव्ह लेक्चर्स'चा आधार

>> नमिता वारणकर

सध्या आपल्या साऱ्यांसाठी बंदीचा काळ सुरू आहे. कोरोना या विषाणुने जगभरात थैमान घातल्यामुळे आपण सारेच जण घरी आहोत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत, कधी होतील हेही सांगता येत नाही… बऱ्याच जणांना या नकारात्मक परिस्थितीमुळे नैराश्य आले आहे… पालक मुलांच्या परीक्षा कधी होतील, त्यांचा अभ्यास कसा होईल या चिंतेत आहेत…अशी ही सक्तीची सुट्टी सगळ्यांसाठी त्रासदायक वाटत असली तरी यातून काही चांगल्या आणि सकारात्मक गोष्टीही घडू शकतात. हे दाखवून दिले आहे समर्थ एज्युकेअर या कोचिंग क्लासचे संस्थापक आणि शिक्षक समर्थ पालकर यांनी… या सक्तीच्या बंदीकाळात ते विद्यार्थ्यांकरिता विनामूल्य ऑनलाईन कोचिंग क्लास घेत आहेत.

बाहेरच्या बिकट परिस्थितीत मुलांचे लक्ष अभ्यासाकडे वळवण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या या लाईव्ह लेक्चर्सबाबत ते सांगतात, साधारणपणे 20 मार्चपासून सगळेच कुटुंबीय घरी आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी सरकार आपल्या परीने प्रयत्न करतच आहेत, मात्र घरी बसलेले विद्यार्थी हे उद्याची भावी पिढी आहेत. तिला रिकामं बसवून चालणार नाही. याकरिता माझ्यातला शिक्षक मला शांत बसू देत नव्हता. म्हणून गेल्या काही दिवसांपासून आम्ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता विनामूल्य ऑनलाईन लेक्चर्स सुरू केली आहेत. या उपक्रमाला विद्यार्थी आणि पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

सध्या गुगलचे महाजाल जगभरात पसरले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या समर्थ एज्युकेअर या क्लासचे संकेतस्थळ तयार केले आहे. काही दिवसांत क्लासचे स्वतंत्र अॅपही विकसित केले जाणार आहे. यात असाईन्मेंट, नोट्स, लेक्चर्स इत्यादी शिक्षणाचा सगळाच भाग आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध केला जाणार आहे. गेले वर्षभर यावर काम सुरू आहे. याविषयी त्यांचे असे म्हणणे आहे की, बंदीचा काळ येईल हे माहित नव्हतं पण लाईव्ह लेक्चर्सकरिता आधीपासूनच प्रयत्न करत होतो. विशेष म्हणजे आतापर्यंत असं वाटत होतं की, अशी लाईव्ह शिक्षणपद्धती मुलांना आवडणार नाही, पण त्यांचे पालक आणि मुलं आता खूप एन्जॉय करत आहेत. यामुळे यापुढे क्लास सुरू राहीलच पण हा बंदीकाळ आमच्यासाठी योगायोग ठरला.

विद्यार्थ्यांची मरगळ दूर …
- अचानक आलेल्या या ल़ॉकडाऊनमुळे मुलांवर ताण येऊ नये म्हणून मुलांना लाईव्ह शिकवण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाला त्यांच्याबरोबर राजेंद्र लोखंडे आणि निखिल मयेकर या शिक्षकांनीही सकारात्मकता दर्शवली. त्यांना ऑनलाईन सुविधा वापरण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. तसेच नितीन नगरकरांच्या मार्गदर्शनाखाली इतर क्लासमधील सदस्यांनी मदत केली. मुलांचा चांगला फिडबॅक लाईव्ह क्लासला मिळू लागला.

- आताच्या काळात ब-याच घरांत मानसिक ताणतणाव सुरू आहेत. त्यामुळे त्यांचा अभ्यास ऑनलाईन क्लास घेतल्यामुळे सुरू राहिला.

- येत्या पंधरा दिवसांत आपण लॉकडाऊनमधून बाहेर आलो तरी ही मुलं अभ्यासापासून वंचित राहिली असे होणार नाही.

- अकरावीच्या परीक्षा होतील की नाही माहित नाही पण ती मुलं बारावीला जाणार आहेत. यावर्षी परीक्षा पुढे ढकलली गेली, तरी दरवर्षी असाच निर्णय होईल असं सांगता येत नाही. व्हेकेशनमध्येच बराचसा अभ्यासक्रम पूर्ण होत असतो. त्यांच्यासाठी आमच्याकडील 11वीच्या विद्यार्थ्यांकरिता 12वीच्या अभ्यासक्रमावर आधारित लाईव्ह लेक्चर्सचा क्लास सुरू केला आहे.

- ऑनलाईन प्रशिक्षणात एकावेळी 100 विद्यार्थी प्रशिक्षण घेऊ शकतात, मात्र सध्या मी घेतलेल्या ऑनलाईन क्लासमध्ये फक्त 35 विद्यार्थीच शिकत होते, तेव्हा जे क्लासमध्ये नाहीत असे विद्यार्थीही या ऑनलाईन क्लासमध्ये विनामूल्य शिकू शकतात, अशी कल्पना सुचली. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना सोशल मीडियामार्फत आवाहन केलं. वर्ग विनामूल्य ठेवण्याचं कारण यामध्ये जास्तीचा काहीच खर्च नव्हता. या क्लासला जे समर्थ एज्युकेअरमध्ये शिकत नाहीत असे पुणे, मुंबईतील काही विद्यार्थी विनामूल्य क्लासला बसू लागले आहेत.

- दहावीला जाणा-या आयजीसीएसईच्या 15 विद्यार्थ्यांकरिताही विनामूल्य ऑनलाईन बॅच सुरू केली आहे.

- प्रत्येक विद्यार्थ्याचे दररोज तीन ते चार तास लाईव्ह लेक्चरमध्ये शिकण्यात जातात. शिवाय त्यांना गृहपाठही दिला जात आहे.

- याबरोबरच उपयुक्त माहितीकरिता मुलांना काही वेबसाईट्स (संकेतस्थळांची) माहिती देण्यात येते. त्या संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवल्याने विद्यार्थ्यांमधील गुणकौशल्ये विकसित होऊ शकतात.

- एकंदरीत लाईव्ह लेक्चर्समुळे घरातील मुलं व्यस्त राहिली. जेईई आणि नीटच्या मुलांना घरी बसून अभ्यासही दिला जातो. त्यामुळे बंदीकाळात विद्यार्थ्यांमधील मरगळीचं वातावारण दूर व्हायला मदत झाली. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी खूश आहेत.

विद्यार्थ्यांना सल्ला…

बंदीकाळामुळे परीक्षा झाली नाही किंवा ज्यांची परीक्षा पुढे ढकलली आहे, अशा विद्यार्थ्यांना एक शिक्षक म्हणून काय सल्ला द्याल, यावर शिक्षक समर्थ पालकर यांचे म्हणणे आहे की, परीक्षेकडे परीक्षा म्हणून बघू नका, तर त्याकडे ज्ञान आणि माहिती मिळवण्याचं साधन या दृष्टीकोनातून बघा. वाचन आणि अभ्यास हा स्वत:साठी असला पाहिजे. कोणी परीक्षा घ्यावी याकरिता नाही. महत्त्वाचे म्हणजे या बंदीकाळात विद्यार्थ्यांनी स्वत:तील कौशल्यं जाणून घ्यायचा प्रयत्न करावा. नव्या संकेतस्थळांचा शोध घ्यावा. जी त्यांना त्यांच्या आवडीच्या करियरमध्ये मार्गदर्शन करू शकतात. आजच्या घडीला फक्त घरी बसून राहण्यासारखं काहीच नाही. करण्यासारखं बरंच काही आहे. याकरिता स्वत:तील आवडीचा शोध घ्या.

  • [email protected]
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top